पांढरकवडा नगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेससोबत युती न करता राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वच्या सर्व म्हणजे सतराच्या सतराही जागा लढवाव्यात, हा पक्षाचा निर्णय झुगारून राष्ट्रवादी काँग्रेसचे पांढरकवडय़ातील नेते माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर यांनी काँग्रेससोबत युती केल्याने राकॉं श्रेंष्ठींच्या नाराजीमुळे ते एकाकी पडल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
मिशन २०१४ लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विदर्भात वाढवण्याच्या आणि घडय़ाळ चिन्ह लोकप्रिय करण्याच्या दृष्टीने काँग्रेससोबत युती न करता राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर नगरपालिकेच्या निवडणुका लढवाव्यात, असे मत राकॉ. नेते व अन्न व औषघ प्रशासन मंत्री मनोहरराव नाईक, आमदार संदीप बाजोरिया, जिल्हा अघ्यक्ष सुरेश लोणकर, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख यांच्यासह सर्व नेत्यांनी व्यक्त केले होते.
उमेदवार कमी निवडून आले तरी चालतील, पण घडय़ाळ चिन्ह लोकप्रिय करण्याच्या दृष्टीने काँग्रेससोबत युती न करणेच योग्य ठरेल, असा नेत्यांचा सूर होता, मात्र माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर यांनी काँग्रेससोबत युती करून सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांना फक्त चार जागा मागून समाघान मानले. काँग्रेसने तेरा आणि राष्ट्रवादी काँग्रेसने चार जागा लढल्या. काँग्रेसने अकरा व राष्ट्रवादीने दोन जागा जिंकल्या. कॉंग्रेस स्वबळावर सत्ता स्थापन करणार आहे तरीही एखादे सभापतीपद आपल्या पक्षाला काँग्रेसने द्यावे, अशी राष्ट्रवादीचे माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर यांची इच्छा असणार आहे व काँग्रेससुघ्दा ती इच्छा पूर्ण करणार आहे.
उल्लेखनीय म्हणजे, पक्षाचा निर्णय झुगारून माजी आमदार पारवेकर यांनी काँग्रेससोबत युती केल्याने राकॉं श्रेंष्ठींपकी एकही नेता प्रचारासाठी आला नव्हता.
चिखलदरा नगरपालिकेच्या झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री आर.आर.पाटील प्रचारासाठी आले होते, पण पांढरकवडा नगरपालिकेच्या निवडणुकीत बाहेरचे मंत्री तर सोडाच, पण राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्ह्य़ातील सुघ्दा एकही नेता निवडणूक प्रचारासाठी आला नव्हता.
राकॉं. नेते व अन्न व औषघ प्रशासन मंत्री मनोहरराव नाईक, आमदार संदीप बाजोरिया, राष्ट्रवादीकाँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सुरेश लोणकर, जिल्हा परिषद अघ्यक्ष प्रवीण देशमुख यांच्यासह सर्व नेत्यांनी बहिष्कारच टाकला होता.
सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांच्या नेतृत्वाला व नगराघ्यक्ष शंकर बडे यांच्या विकास कार्याला मतदारांनी पुन्हा एकदा मान्यता दिली असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे व काँग्रेसचे जिल्हा अघ्यक्ष आमदार वामनराव कासावार यांनी व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा