महापालिका निवडणूक
महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना आणि मनसे या सर्व पक्षांनी तयारी सुरू केली असून, ही निवडणूक स्वत:ला पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी चांगली संधी असल्याचे जाणून काँग्रेसचे माजी मंत्री रोहिदास पाटील यांनी सर्व प्रभागांमध्ये बैठक घेण्यावर भर दिला आहे.
मागील निवडणुकीत काँग्रेसला सर्व जागांवर उमेदवार उभे करता आले नव्हते. तर, शहराध्यक्ष युवराज करनकाळ यांच्यासह अनेक दिग्गज पराभूत झाले होते. काँग्रेस डळमळीत झाले असताना राष्ट्रवादी, शिवसेना, लोकसंग्राम यासारख्या पक्षांनी महापालिकेवर पकड मजबूत केली होती. या एकूण घडामोडीत अवघ्या तीन सदस्यांच्या जोरावर भाजपने महापौरपद मिळविण्याची रणनीती यशस्वी करून दाखवली होती. जिल्ह्य़ातील काँग्रेस पक्षात ज्येष्ठ समजले जाणारे सर्वच नेते महापालिकेच्या निवडणुकीत गांभिर्याने कामाला न लागल्याचा हा परिपाक होता असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. मागील निवडणुकीतील पुनरावृत्ती टाळण्यासाठी यावेळी रोहिदास पाटील यांनी महापालिका निवडणुकीची सूत्रे काँग्रेसच्या वतीने स्वीकारल्याने विरोधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना नेटाने कामाला लागणे भाग पडले आहे. पाटील यांच्या नेतृत्वाखालील विविध संस्थांमधील कर्मचारी आणि त्यांचे वैयक्तिक चाहते हीच त्यांची ‘मत बँक’ आहे. पाटील यांच्या सक्रिय कार्यकर्त्यांच्या फळीला ‘जवाहर गट’ म्हणून ओळखले जाते.
रोहिदास पाटील महापालिका निवडणुकीत अचानक सक्रिय होण्यामागील अनेक कारणे सांगितली जातात. नऊ वर्षांपासून राज्यात काँग्रेसची सत्ता असूनही पाटील अंधारातच राहिले. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्षद त्यांच्याकडे असूनही पक्षांतर्गत विरोधी गटाचे मानले जाणारे अमरिश पटेल यांना काँग्रेसने वेळोवेळी संधी दिली. त्यामुळे पाटील यांना पटेल यांच्या मतदार संघात फिरण्यावर र्निबध येतात. याउलट पटेल आणि त्यांचाच राजकीय वरदहस्त लाभलेल्या काशिराम पवार या आमदाराच्या कारकीर्दीत मतदार संघातील कामे उरकणे सोपे होत आहे. आ. पवार आणि आ. पटेल या जोडगोळीने जनसंपर्क कायम ठेवत मतदारसंघात आपली राजकीय बैठक अधिकाधिक मजबूत केली आहे.
पाटील यांनी नेटाने काम केल्यास काँग्रेसला धुळे जिल्ह्य़ात पूर्ववैभव प्राप्त होवू शकते, याची खात्री देण्यासाठी महापालिका निवडणूक ही एक संधी आहे. यामुळे महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकावून दाखविणे जवाहर गटाला महत्वाचे ठरले आहे. याचा लाभ नंतर विधानसभा निवडणुकीवेळी होऊ शकतो. यामुळेच त्यांनी वैयक्तिक लक्ष घालून इच्छुकांच्या भावना जाणून घेण्यास सुरूवात केली आहे. पाटील यांच्या नेतृत्वाखाली चालणारे कितीतरी प्रकल्प बंद पडले, डबघाईला गेले असे भांडवल करीत आ. अनिल गोटे यांनी पाटलांना आता महापालिका खड्डय़ात टाकायची आहे काय, असा प्रश्न करून पाटलांचे राजकीय मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न केला आहे. असे असले तरी गोटेंच्या लोकसंग्राम पक्षाच्या सहाय्याने काँग्रेसने महापालिकेवर वर्चस्व मिळविणे आणि नंतर त्या मोबदल्यात शहर विधानसभा मतदारसंघातून गोटे यांना विधानसभेत पाठविणे असे अंदाज व्यक्त केले जात आहेत. अशा स्थितीत राष्ट्रवादी, भाजप, शिवेसना, मनसे तसेच अपक्षांचे आव्हान गोटे व स्वत: पाटलांना पेलावे लागेल. अन्यथा या दोघांच्या जुगलबंदीत तिसऱ्याला लाभ होऊ शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा