पालिकेत दररोज उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पालिका पदाधिकाऱ्यांनी गुलाब देऊन स्वागत केल्यानंतर कर्मचाऱ्यांनी पालिकेत नियमानुसार काम सुरू केले आहे. सकाळी पावणे दहा वाजता येणारे कर्मचारी साडेपाच वाजले की काम पूर्ण करून कार्यालयातून बाहेर पडत आहेत.
या कर्मचाऱ्यांमध्ये अधिकारी, लिपीक, शिपाई संवर्गातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कामगार संघटनेच्या नेत्यांनी कामगारांना नियमानुसार काम करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये पालिका कार्यालयात संध्याकाळी उशिरापर्यंत बसणाऱ्या पालिका पदाधिकाऱ्यांची सर्वाधिक अडचण झाली आहे. स्वीय साहाय्यक, लिपीक, शिपाई वर्ग संध्याकाळी साडेपाच वाजता काम सोडून निघून जात असल्याने पदाधिकारी, त्यांच्या समर्थकांची चहा, वडापाव, मिसळची सरबराई करण्यासाठी कुणीही कार्यालयात राहत नसल्याने नाइलाजाने पदाधिकाऱ्यांना साडेपाचनंतर आपला कारभार आवरता घ्यावा लागत   आहे.
आम्ही उशिरा आलो तरी उशिरापर्यंत थांबत होतो. वाढीव कामाच्या भत्त्याचा विचार न करता आमचे काम सुरू होते. तरीही आम्ही वेळेवर यावे असे महापौर, उपमहापौर, गटनेत्यांना वाटत असेल तर यापुढे आम्ही वेळेप्रमाणेच कार्यालयातून बाहेर पडणार असे कर्मचाऱ्यांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वी महापौर, उपमहापौरांनी उशिरा येणाऱ्या २७९ कर्मचाऱ्यांना गुलाब देऊन त्यांचे अनोखे स्वागत केले होते. त्याचा कर्मचाऱ्यांना राग आला आहे.
कसोटी महासभेची
दरमहा होणारी पालिकेची महासभा दुपारी केव्हाही सुरू झाली तरी ती रात्री उशिरापर्यंत सुरू राहते. त्यामुळे येणाऱ्या महासभेत अधिकारी, शिपाई वर्ग नियमानुसार काम म्हणून महासभेतून साडेपाच वाजता निघून गेला तर चहा-पाण्याविना पदाधिकाऱ्यांना सभेचे कामकाज चालवावे लागेल. कर्मचारी ही गांधीगिरी करतात की शांत राहतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या कर्मचाऱ्यांचा एक नेता नगरसेवक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा