महापालिकेतर्फे साजरे केले जाणारे सर्व महोत्सव रद्द करून यापुढे दरवर्षी फक्त चारच महोत्सव साजरे करावेत, असा निर्णय बुधवारी पक्षनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला. मात्र, या निर्णयाची खरोखरच अंमलबजावणी होणार, का वर्गीकरणांचे प्रस्ताव देऊन पुन्हा पुढच्या वर्षीही महोत्सव भरवले जाणार, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
महापालिकेतर्फे दरवर्षी विविध प्रकारचे महोत्सव भरवले जातात. पूर्वी अशा महोत्सवांना महापालिका लाखो रुपयांचे सहप्रायोजकत्व देत असे. हे सर्व महोत्सव नगरसेवक आपापल्या भागात भरवतात. मात्र, सहप्रायोजकत्वाची तरतूदच कायद्यात नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर हे महोत्सव दोन वर्षांपूर्वी अडचणीत आले. त्यातून मार्ग काढण्यासाठी महापालिकेचे पदाधिकारी, गटनेते तसेच काही प्रभावी नगरसेवकांकडून महापालिकेच्या अंदाजपत्रकातच त्यांच्या महोत्सवांचा समावेश करण्याची नवीन पद्धत रूढ झाली.
यातील एकेका महोत्सवावर पाच ते तीस लाख रुपये इतका खर्च होत असून त्यांचा कालावधी दोन ते तीन दिवसांचा असतो. पक्षनेत्यांच्या बैठकीत बुधवारी अन्य सर्व महोत्सव रद्द करून पुढील वर्षांपासून फक्त चारच महोत्सव भरवण्यात यावेत, असा निर्णय घेण्यात आला. गणेशोत्सवात आयोजित केला जाणारा शनवारवाडा महोत्सव, शिवजयंती महोत्सव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त होणारा भीम फेस्टिव्हल आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त होणारा महोत्सव हे चारच महोत्सव पुढील वर्षांपासून आयोजित करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. पक्षनेत्यांनी हा निर्णय घेतलेला असतानाच स्थायी समितीमध्येही बुधवारी आयुक्तांनी पुढील वर्षांपासून महोत्सवांच्या प्रायोजकत्वाचे प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत, असे स्पष्ट केले. पक्षनेत्यांनी हा निर्णय घेतला असला, तरी या चार महोत्सवांव्यतिरिक्त जे अन्य महोत्सव आयोजित केले जातात, ते वेगळय़ा मार्गानी पार पाडण्यासाठी नगरसेवक प्रयत्न करतील, तसेच त्यांच्या खर्चासाठी वर्गीकरणाचेही प्रस्ताव दिले जातील. चालू वर्षांतही असे अनेक प्रस्ताव स्थायी समिती व मुख्य सभेत मंजूर झाले असून अनेक ठिकाणी महोत्सवांवर लाखो रुपये खर्चही झाले आहेत. तसेच अनेक महोत्सवांच्या आयोजनावरून वादही झाले आहेत. असेच प्रस्ताव आगामी आर्थिक वर्षांत मंजुरीसाठी आल्यास महोत्सव रद्द करण्याच्या भूमिकेवर पक्षनेते ठाम राहणार का, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

Story img Loader