शहरात एकूण लोकसंख्येच्या साडेसात टक्के म्हणजे सुमारे बारा लाख ज्येष्ठ नागरिक आहेत. एकाकीपणा, आरोग्य, सुरक्षेच्या समस्या यांचा सामना करत असलेल्या या नागरिकांसाठी शहरात अजूनही विशेष जागृती आलेली नाही. त्यामुळे याही प्रश्नासंदर्भात आता न्यायालयात जाण्याची वेळ सामाजिक संघटनांवर आली आहे. सर्वात श्रीमंत महानगरपालिका आणि नावाजल्या जाणाऱ्या मुंबई पोलिसांचे पाठबळ असतानाही अंमलबजावणीतील अपयशामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या गंभीर होत आहेत. या सर्व समस्या आणि ज्येष्ठ नागरिकांबाबत मुंबईतील धोरणावर टाकलेला दृष्टिक्षेप..
ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून त्यांच्यासाठी वेगळे धोरण तयार करण्यात मुंबई महानगरपालिकेचा देशात पहिला क्रमांक लागतो. पालिकेने ऑगस्ट २०१३ मध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या धोरणावर शिक्कामोर्तब केले. मात्र रस्ते, पाणी, सांडपाणी, कचरा यांना प्राधान्य देत हजारो कोटी रुपयांचा खर्च करताना या धोरणाची अंमलबजावणी मात्र कासवगतीने पुढे सरकते आहे.
मुंबईत एकूण लोकसंख्येच्या सात टक्के म्हणजे साधारण १२ लाख ज्येष्ठ नागरिक आहेत. या नागरिकांना आरोग्य, सुरक्षा, मनोरंजन अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर सेवासुविधांची गरज भासते. याविषयी तत्कालीन महापौर आणि भाजपचे नगरसेवक विनोद शेलार यांनी पुढाकार घेऊन २०१२ मध्ये १ ऑक्टोबर या ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त शहरात विविध सेवासुविधा पुरवण्यासंबंधी हालचाली सुरू केल्या. यानुसार पालिकेच्या मदानांमध्ये ज्येष्ठांसाठी वेगळी व्यवस्था, प्रत्येक वॉर्डमध्ये विरंगुळा केंद्र, ज्येष्ठांच्या कार्यक्रमांसाठी पालिका शाळेतील वर्ग महिन्यातून एकदा मोफत खुला करणे, सार्वजनिक शौचालयात रेिलग आणि रॅम्प, चाळीत राहणाऱ्या ज्येष्ठांसाठी शौचालय बांधण्याची अट शिथिल करणे, पालिका रुग्णालये व दवाखान्यात वेगळी व्यवस्था ठेवणे आदी बाबींचा समावेश होता. ऑगस्ट २०१३ मध्ये हे धोरण मंजूर करण्यात आले व त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूदही करण्यात आली. मात्र रस्ते, पाणी, कचरा हे प्राधान्यक्रम असलेल्या पालिकेत ज्येष्ठ नागरिक धोरण राबविण्यासाठी वेग घेतलेला नाही हेदेखील खरे.
आरोग्य धोरण मंजूर होऊन वर्ष उलटल्यावरही फारसे काही झाले नव्हते. आरोग्य विभागात ज्येष्ठांसाठी त्वरेने सोयी उपलब्ध झाल्यात. त्यानुसार रांगेत ज्येष्ठांना प्राधान्यक्रम दिला जातो. मात्र सर्व दवाखाने व रुग्णालयात ज्येष्ठांसाठी विशेष आरोग्य सुविधा देण्याबाबत पाऊल उचलण्यात आलेले नाही. उद्यानांमध्ये ज्येष्ठांसाठी काही ठिकाणी जागा वेगळ्या ठेवण्यात आल्या आहेत. मात्र सर्व मदानांमध्ये त्याची अंमलबजावणी झालेली नाही. शौचालयात रेिलग आणि रॅम्प बसवण्याचे कामही अर्धवट आहे. चाळींमध्ये शौचालय बांधण्यासाठी अट शिथिल करण्यात मर्यादा येत असल्याने याबाबत पालिकेने ठोस भूमिका घेतलेली नाही.
गेल्या सहा महिन्यांत शहरातील सहा ठिकाणी विरंगुळा केंद्रे स्थापन झाली आहेत. या विरंगुळा केंद्रांमध्ये वर्तमान पत्रे, मासिके यांच्यासह ज्येष्ठांना विरंगुळा देणारे अनेक उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. मात्र ज्येष्ठांच्या घराजवळ ही केंद्रे असणे आवश्यक आहे. शहराचा पसारा पाहता प्रत्येक वॉर्डमध्ये किमान तीन ते चार विरंगुळा केंद्रे असणे आवश्यक आहे. मात्र पालिकेचे आस्ते कदम सुरू असून या जानेवारीअखेर सातवे केंद्र सुरू होणार आहे.
पालिकेच्या ज्येष्ठ नागरिक धोरणातील तरतुदी
    पालिकेची उपनगरी रुग्णालये आणि दवाखान्यांत वृद्धांसंदर्भातील विशेष वैद्यकीय सेवा
    उद्यानातील काही भाग ज्येष्ठांसाठी आरक्षित असल्याचे फलक
    चाळीतील घरांमध्ये शौचालय बांधण्याच्या अटीत शिथिलता.
    सर्व सार्वजनिक शौचालयांमध्ये रेिलग आणि रॅम्प
    ज्येष्ठ नागरिकांच्या संघटनांच्या सभेसाठी पालिका शाळेतील एक वर्ग महिन्यातून एकदा नि:शुल्क मिळणार
    धोरणाच्या अंमलबजावणीसाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली समिती
    प्रत्येक वॉर्डमध्ये विरंगुळा केंद्र काढणार
    नवीन विकास योजनांत ज्येष्ठांच्या विरंगुळा केंद्रासाठी जागा आरक्षित ठेवण्याची अट.
१०३ क्रमांकाची हेल्पलाइन
सध्या मुंबई पोलिसांतर्फे १०३ क्रमांकाची हेल्पलाइन सेवा सुरू करण्यात आलेली आहे. संकटकाळी या हेल्पलाइनवर संपर्क केल्यास तात्काळ मदत पोहोचविण्यात येते. अनेकदा वृद्ध नागरिक काही वैयक्तिक कारणांसाठी पोलीस ठाण्यात दूरध्वनी करून मदत मागवत असतात. त्यांना ही मदत पोहोचवली जाते. एकाकी राहणाऱ्या वृद्धांची रेकी करून त्यांच्या घरात चोरी केली जाते, प्रसंगी त्यांच्या हत्याही होतात. यासाठी आम्ही विशेष दक्ष असतो, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. बाहेर पडणाऱ्या वृद्धांना तोतया पोलीस बनून लुटले जाते. त्यापासून कसे सावध राहावे याच्या सूचनाही वृद्धांना वेळोवेळी दिल्या जातात, असेही ते म्हणाले. आम्ही ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षा देण्याचा प्रयत्न करतो. परंतु त्यांना खरी गरज ही आपल्या माणसांच्या आधाराची असते. तो मिळत नाही म्हणून माझ्याशी बोलाल का, अशी विचारणा करणारे वृद्धांचे फोन पोलीस ठाण्यात येत असतात, याकडेही या अधिकाऱ्याने लक्ष वेधले.