०  अस्वच्छता करणाऱ्यांविरोधात मोहीम
०  गोदावरीत वाहने धुणाऱ्यांना ५०० रुपये दंड
शहरातील वाढती अस्वच्छता.. घाणीचे साम्राज्य.. अनियमित घंटागाडी..अस्वच्छतेच्या फैलावामुळे निर्माण होणारे साथीचे आजार..यामुळे जाग आलेल्या महापालिकेने मुंबईच्या धर्तीवर सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची भूमिका घेतली आहे. याअंतर्गत गोदावरीचे प्रदूषण रोखण्यासाठी घाण टाकणाऱ्यांविरूध्द तसेच नदीत वाहने धुणाऱ्यांना दंड करण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समिती सभापती उध्दव निमसे यांनी दिली.
निमसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेस शिवसेनेचे गटनेते अजय बोरस्ते, काँग्रेसचे दिनकर पाटील, यांसह इतरही सदस्य उपस्थित होते. शहर व परिसरात काही दिवसांपासून घंटागाडी अनियमित असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात होत्या. वाढत्या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार जोरात फैलावत असल्याने रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. या पाश्र्वभूमीवर पालिकेने कठोर निर्णय घेतले. पालिका आणि सेवक प्रतिष्ठान संचलित अमूल्या क्लिनअप सव्‍‌र्हिसेस यांच्या वतीने सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना दंड केला जाणार आहे. रेल्वे व बस स्थानक, भाजीपाला बाजार, शाळा व महाविद्यालये, रुग्णालये, उद्यान, फेरीवाला क्षेत्र, मॉल्स, चित्रपटगृह, व्यावसायिक कॉम्पलेक्स, गोदावरीचा परिसर, अशा ठिकाणी अस्वच्छता केल्यास १०० पासून १० हजार रूपयांपर्यत दंड करण्यात येणार आहे. त्यातील ४० टक्के महसुल पालिकेला तर उर्वरीत ६० टक्के रक्कम सदर संस्थेला व्यवस्थापन खर्चासाठी देण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी ही कारवाई करतांना संबंधीत संस्थेच्या कर्मचाऱ्यांना पालिकेचे बोधचिन्ह असलेला गणवेश व ओळखपत्र देण्यात येईल. तसेच सुरक्षितेसाठी शिट्टी, लाठी, कॅमेरा, वाहन या साधनांचा वापर कर्मचाऱ्यांना करता येणार आहे. कर्मचाऱ्यांकडून अन्यायकारक पध्दतीने दंड वसुली होत असल्यास आरोग्य अधिकाऱ्याकडे तक्रार करता येणार आहे. सदरचे काम दोन वर्षांकरिता देण्यात येणार असून त्यासाठी एक लाख रुपये अनामत रक्कम म्हणून स्वीकारली जाणार असल्याचेही निमसे यांनी सांगितले.
शहरात अनेक ठिकाणी अद्यापही उघडय़ावर मांस विक्री सुरु असल्याची तक्रार दिनकर पाटील यांनी केली. त्याची दखल घेत निमसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना उघडय़ावर मांस विक्री करणाऱ्यांविरुध्द कारवाईच्या सूचना दिल्या. याव्यतिरिक्त पत्रिकेवरील सर्व विषय यावेळी मंजूर करण्यात आले. त्यामध्ये पाणी, उद्यान, रस्ते खडीकरण, डांबरीकरण, यांसह इतरही विषयांचा समावेश आहे.