मराठवाडा विभागात यंदा कमी पावसामुळे पाणीटंचाईचे संकट आहे. या पाश्र्वभूमीवर नगरपालिकांनी पाण्याचा काळजीपूर्वक वापर करावा. पिण्याच्या पाण्याच्या पर्यायी स्रोतांचा शोध घेणे व नियोजन करणे, िवधन विहिरी घेणे, विहिरींचा गाळ काढणे, तात्पुरत्या पाणीपुरवठा योजना पूर्ण करणे, तसेच येत्या जुलैपर्यंतच्या पाणीपुरवठय़ाचे नियोजन करण्याची सूचना डॉ. भापकर यांनी केली. नगरपालिकांनी करवसुलीचे प्रमाण वाढवावे, अशीही सूचना त्यांनी या वेळी केली.
औरंगाबाद विभागातील नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांची विविध विषयांवरील आढावा बैठक शुक्रवारी येथील विभागीय आयुक्त कार्यालयात डॉ. भापकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी नगरपालिकांच्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. उपायुक्त विजयकुमार पवार, लातूर आणि परभणी महापालिकांचे आयुक्त अनुक्रमे धनंजय जावळीकर व सुधीर शंभरकर यांच्यासह मराठवाडय़ातील जिल्हा प्रकल्प अधिकारी, महापालिकांचे पाणीपुरवठा अधिकारी उपस्थित होते. बैठकीत सुवर्णजयंती शहरी रोजगार योजना, संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियान, आधार कार्डाशी वैयक्तिक लाभांच्या योजनांशी सांगड घालणे, अल्पसंख्याक विकास कार्यक्रम, ई-गव्हर्नन्स प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन आदी कामांचा आढावा घेण्यात आला.