काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आगामी काळात योग्य व्यक्तीला निवडून दिले तरच प्रपंच व्यवस्थित चालतील असे सांगून त्यांनी भविष्यातील रणनीतीचे संकेत दिले.
मुरकुटे यांनी मागील विधानसभा निवडणुकीत विजय शिंदे यांना अपक्ष म्हणून रिंगणात उभे केले होते. पण ते तिस-या क्रमांकावर फेकले गेले. कांबळे हे विजयी झाले. निवडणुकीनंतर मुरकुटे यांनी पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला. काँग्रेस व राष्ट्रवादीत राज्यात युती आहे, पण स्थानिक पातळीवर त्यांच्यात कट्टर हाडवैर आहे. निवडणुकीत युती होणार असली तरी स्थानिक मतभेदामुळे राष्ट्रवादीचे मुरकुटे स्वतंत्र भूमिका घेतील असा अंदाज आहे. त्यांनी निपाणीवाडगाव सेवा संस्थेच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजनप्रसंगी तसे संकेत दिले. या वेळी बोलताना मुरकुटे म्हणाले, धरणे भरूनही पाटपाण्याची शाश्वती नसल्याने शेती व्यवसाय अडचणीत आला आहे. उसाच्या ब्लॉकला मंजुरी मिळालेली नाही, त्यामुळे पिकाचे नियोजन करता येत नाही. समन्यायी पाणीवाटप कायद्याने घात केला. आमदारांनी सरकारकडे पाटपाण्याचा आग्रह धरायला हवा होता, पण गोदावरी खो-यातील कोणत्याही आमदाराने हे केले नाही. शेतकरी अडचणीत आल्याने त्याचा परिणाम संस्थावर होत आहे. आपल्या ताब्यात तालुक्याची सत्ता होती तेव्हा सरकारला वठणीवर आणण्यासाठी आंदोलने केली. आता आगामी काळात काम करणा-यांनाच निवडून द्या तरच आपले प्रपंच चांगले राहतील असे आवाहन केले. मुरकुटे यांनी केलेल्या वक्तव्यामागे आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती असल्याचे बोलले जाते.
 काशिनाथ गोराणे यांनी प्रास्ताविक केले. या वेळी सहायक निबंधक जितेंद्र शेळके, कविता राऊत, संपत देसाई, रंगनाथ गायधने आदींची भाषणे झाली. या वेळी अशोकचे अध्यक्ष सुरेश गलांडे, बाबासाहेब काळे, माणिक शिंदे, सोपान राऊत, रावसाहेब शिंदे, सुनीता गायकवाड आदी उपस्थित होते.

Story img Loader