चौदा वर्षीय मुलीचा बलात्कार करून निर्घृण खून केल्याचा संतापजनक प्रकार परभणी शहरात रविवारी मध्यरात्री घडला. या प्रकरणी अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल झाला. चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
पाथरी रस्त्यावरील संत तुकारामनगरमध्ये खोली भाडय़ाने घेऊन एक महिला राहत होती. तिची अल्पवयीन बहीण तिच्यासोबतच असे. सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास पीडित मुलगी मृतावस्थेत असल्याचे मोठय़ा बहिणीने पाहिले. तिने तत्काळ नानलपेठ पोलिसांना कळविले. पोलिसांनी मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठविला. तीन महिला डॉक्टरांसह पाच डॉक्टरांच्या पथकाने मृतदेहाचे शवविच्छेदन केले. दरम्यान, मृतदेह शासकीय रुग्णालयात आणल्यानंतर मोठा जमाव जमला होता. पोलीस बंदोबस्तात शवविच्छेदन करण्यात आले. पोलिसांनी मात्र घटनेविषयी गुप्तता पाळत संशयितांची नावे सांगण्यास नकार दिला. घटनेच्या तपासासाठी पोलिसांची चार पथके स्थापन करण्यात आली.
पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले, की घडलेल्या प्रकाराचा कसून तपास केला जात आहे. सुरुवातीला पीडित मुलीच्या बहिणीने संबंधित मुलीचा साप चावल्याने मृत्यू झाला, असे कारण सांगितले होते. त्यामुळे बहिणीचीही चौकशी करण्यात येत आहे.

Story img Loader