आपसात भांडण का करता, अशी विचारणा करणाऱ्या तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून करणाऱ्या आनंदा परसराम पानेवार (वय ४०) याला सोमवारी नांदेडच्या न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्या. डब्ल्यू. डी. मुल्ला यांनी आज या प्रकरणाचा निकाल देताना त्याला पाच हजार रुपयांचा दंडही ठोठावला.
मुदखेड तालुक्यातल्या हज्जापूर येथील आनंदा पानेवार २८ ऑगस्ट २०११ रोजी चिकाळा तांडा येथे दारू पिण्यासाठी गेला होता. काही वेळानंतर तेथे शिवाजी कोंडिबा कापसे (वय ४५), संदीप व सुदाम हे तेथे पोहोचले. त्या दिवशी पोळा सण होता. या चौघांनी दारू प्यायल्यानंतर आनंदा पानेवार याने सुदाम जाधव याला पसे दे म्हणत मारहाण केली. मृत शिवाजी कापसे याने आपसात भांडण का करता, अशी विचारणा केली. शिवाजी कापसे आपल्या घरी परतत असताना मधुकर चव्हाण यांच्या शेतात आनंदाने त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. कोंडिबा कापसे याने दिलेल्या तक्रारीवरून मुदखेड पोलिसांनी आनंदा पानेवार याच्याविरुद्ध खून केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला. तत्कालीन पोलीस निरीक्षक पी. एम. खेडकर यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयाने ११ जणांच्या साक्षी नोंदवल्या. न्या. डब्ल्यू. डी. मुल्ला यांनी आनंदा पानेवार याला जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात सरकारच्या वतीने अॅड. व्ही. एम. पवार निवघेकर यांनी तर आरोपीच्या वतीने अॅड. उमेश मेगदे यांनी काम पाहिले.
दगडाने ठेचून खून; आरोपीस जन्मठेप
आपसात भांडण का करता, अशी विचारणा करणाऱ्या तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून करणाऱ्या आनंदा परसराम पानेवार (वय ४०) याला सोमवारी नांदेडच्या न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
First published on: 16-07-2013 at 01:58 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Murder to stone crush accused imprisonment