जुन्या भांडणातून संतप्त आरोपीने एका तरुणाचा फरशी डोक्यात हाणून खून केला. काटोल रोडवरील सीपीडब्ल्यूडी कॉलनीत रविवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
रमण सुयोधन मोहाडे (रा. बोरगाव रोड) हे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. ८-१० महिन्यांपूर्वी रमण व एका तरुणाचे भांडण झाले होते. रमण याने त्यास मारहाण केली होती. हे प्रकरण सध्या न्यायालयात आहे. ज्याला रमणने मारहाण केली होती त्याच्याकडे रमण ३-५ महिन्यांपूर्वी गेला होता. ‘तक्रार मागे घे’, असे रमण त्याला म्हणाला. त्याने नकार दिला. त्यामुळे रमणने त्याला मारहाण केली. तो ऐकत नसल्याने त्याचा मित्र चंडिकाप्रसाद मोहनदत्त गौर (रा. सीपीडब्ल्यूडी कॉलनी) याला रमणने काही दिवसांपूर्वी गाठले. ‘तुझ्या मित्रास समजाव, तक्रार मागे घेण्यास सांग’, असे रमण त्याला म्हणाला. मात्र, ‘तो ऐकणार नाही तुच त्याला म्हण’, असे चंडिकाप्रसाद रमणला म्हणाला. रमणने त्याच्यामागे तगादा लावला होता. काल रात्री रमण मित्रासह चंडिकाप्रसादच्या घरी गेला. तक्रार मागे घेण्यासंबंधी रमण त्याला बोलला. ‘तो ऐकणार नाही, मी मध्ये पडत नाही तूच त्याला म्हण’ असे चंडिकाप्रसाद त्याला म्हणाला. रमणला याचा राग आल्याने अश्लील शिवीगाळ करीत रमणने त्याच्या थोबाडीत मारली. यावेळी चंडिकाप्रसादची बायको-मुले समोर होती. चंडिकाप्रसाद संतापला. त्याने रमणला ढकलले. रमण खाली पडला. शेजारी पडलेली फरशी उचलून त्याने रमणच्या डोक्यावर हाणली. रमण ठार झाला. त्याच्या खुनाप्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी आरोपी चंडिकाप्रसादला अटक केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा