बहिणीची छेड काढणाऱ्यास हटकणाऱ्या भावाचा निर्घृणपणे भोसकून खून करणाऱ्या गुन्हेगाराला कनिष्ठ न्यायालयाने ठोठावलेली जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाने कायम केली आहे. नवी दिल्ली येथे एका मुलीवर घडलेल्या अत्याचारामुळे देशात संतापाची लाट उसळली असल्याच्या पाश्र्वभूमीवर हा निकाल महत्त्वाचा ठरला आहे.
ही संतापजनक व तितकीच दुर्दैवी घटना बुलढाणा जिल्ह्य़ात आठ वर्षांपूर्वी घडली होती. संग्रामपूर तालुक्यातील एका गावी राहणाऱ्या १७ वर्षांच्या युवतीने खेर्डा येथील महात्मा फुले विद्यालयातून मॅट्रिकची परीक्षा दिली.
 इंग्रजी विषयाचा पेपर देऊन ती दुपारी २ वाजता इतर मुलींसोबत शाळेच्या फाटकाबाहेर आली. रोजच्याप्रमाणे तिचा मोठा भाऊ नामदेव (२०) हा तिला घेऊन जाण्यासाठी शाळेत आला होता. दोघेही गावाला जाण्यासाठी एसटी स्टँडकडे जात असताना विठ्ठल साहेबराव चोपडे हा आरोपी तेथे आला आणि नामदेवच्या उपस्थितीत या युवतीला चिडवू लागला. इतर मुलींसह अनेक लोक तेथे हजर असताना कुणीही विठ्ठलला हटकण्याचे प्रयत्न केले नाहीत. नामदेवला मात्र हे सहन न झाल्याने त्याने विठ्ठलला दम भरला. यामुळे चिडलेल्या आरोपीने कंबरेचा चाकू काढून नामदेवच्या पोटावर वार केले. यामुळे नामदेव रक्तबंबाळ होऊन खाली कोसळला. उपचारासाठी इस्पितळात हलवले असता तो मरण पावला.
पोलिसांनी विठ्ठलविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवून त्याला अटक केली व तपासानंतर न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. सत्र न्यायालयाने विठ्ठलला या गुन्ह्य़ासाठी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या शिक्षेविरुद्ध विठ्ठलने उच्च न्यायालयात अपील केले होते.
परीक्षा देण्यासाठी आलेले सुमारे ५०० ते हजार विद्यार्थी घटनास्थळी हजर असताना इतर कुणीही साक्ष देण्यास पुढे आले नाही, हा नेहमीचा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य मानला नाही. आपल्या लाडक्या बहिणीची छेड काढू नये यासाठी विरोध नोंदवणाऱ्या नामदेवसारख्या तरुण मुलाला जीव गमवावा लागावा ही दुर्दैवी बाब आहे. अर्जदार आरोपीजवळ आधीच ३० सेंटिमीटर लांबीचा चाकू होता, यावरून त्याची पूर्वतयारी होती, तसेच त्याने निर्घृणपणे व तयारीने खून केला हे स्पष्ट होते. त्याला या मुलीला आणि तिच्या कुटुंबाला दहशत दाखवायची होती. शिवाय आरोपी मवाल्यासारखा गावात फिरत असे आणि शाळकरी मुलींच्या मागे लागण्याची गुन्हेगारी वृत्ती त्याच्यात बळावली होती, असे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले.
समाजात घडत असलेल्या दु:खद घडामोडींचे, तसेच विशेषत: महिलांविरुद्धचे गुन्हे वाढल्याचे हे एक उदाहरण आहे. शहरी भागातील सामाजिक विकृती आता ग्रामीण भागापर्यंत झिरपल्याचे यावरून दिसून येते. छेडखानी करणे आणि त्याला अटकाव करणाऱ्याचा खून करणे यासारख्या घटना वाढीला लागल्या असून यातील गुन्हेगारांना मृत्यूदंडासारखी कठोर शिक्षा देणे आवश्यक आहे, असे नमूद करून न्या. प्रताप हरदास व न्या. अरुण चौधरी यांच्या खंडपीठाने विठ्ठलचे अपील फेटाळून लावत सत्र न्यायालयाने त्याला सुनावलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले. अर्जदारातर्फे अॅड. निशा गजभिये यांनी, तर सरकारतर्फे सहायक सरकारी वकील मेहरोझ पठाण यांनी काम पाहिले.