नाशिककरांना तांबट बंधू हे नाव नविन नाही. तीन पिढय़ांपासून कलेचा वारसा त्यांनी जपला आहे. कासार कामासोबत शिल्पकला आणि चित्रकला यामधील त्यांचे प्राविण्य उल्लेखनीय म्हणावे लागेल. शहरातील अशोकस्तंभाची मुद्रा तर काही महिन्यांपूर्वी ऐतिहासिक नारोशंकराच्या घंटेला दिलेली झळाळी हा सर्व त्यांचा बोलका इतिहास म्हणता येईल.
रतनलालभाई तांबट यांनी चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांच्यासोबत काम केले. पुढे त्यांनी तीन मुलांना जे. जे. स्कूल ऑफ आर्टसमधून वेगवेगळ्या कलेचे शिक्षण घेतले. यात बाबूभाई तांबट फाइन आर्टस, न्हानालाल तांबट कमर्शियल आर्ट आणि दयाराम तांबट शिल्पकला शिकले. यातून एकप्रकारे तांबट बंधू हा ब्रान्ड तयार झाला. तिसऱ्या पिढीतील प्रसन्न तांबट आज कलेचा वारसा यशस्वीपणे पुढे नेत आहेत. बदलत्या काळानुसार त्यांनी कलेमध्ये प्रयोगशीलता आणि आधुनिकता यांची सुरेख सांगड घातली आहे.
मूर्तीकलेचा विचार केला असता काही वर्षांपूर्वी शाडूच्या मातीचा गणपती आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचा देखावा, असे समीकरण तांबट बंधूंसाठी तयार झाले. सुबक आणि देखण्या मूर्ती ही तांबट बंधूंची खासियत. आखीव-रेखीव काम करून मूर्ती बोलकी करणे, हीच त्यांची ओळख. त्यामुळेच तांबट बंधूंनी घडवलेली कुठलीही मूर्ती कपडे घालून सजवलेली दिसत नाही. उलट नाजूक आणि रेखीवपणामुळे सुंदर बनलेली दिसते. तांबट बंधूंच्या या अनोख्या नियमाबाबत बोलताना प्रसन्न तांबट यांनी मूर्ती बनवतांना कल्पकतेनेच काम करायचे असंच आम्हाला  शिकविण्यात आल्याचे ते सांगतात.
मूर्ती कामात ‘मोल्ड मेकींग’ अर्थात साचा तयार करणे हे प्रसन्न तांबट यांचे सर्वात आवडते काम आहे. घरात आधीपासून मूर्ती तयार करण्याच्या प्रक्रियेत सर्वच कुशल. मात्र मोल्ड मेकिंगमध्ये इतरांवर अवलंबून राहावे लागे. हीच गोष्ट ओळखून त्यांनी यात कौशल्य मिळवले. तसेच शिल्पकलेतील अनेक बारकावे हळूहळू काम करून आणि बघून बघून शिकून घेतले. १९७८ मध्ये त्यांनी स्वतंत्रपणे कामाला सुरूवात केली. त्यावेळी वडिलांचा गणपती तयार करण्याचा कारखाना होता. त्याजोडीला देखाव्याचेही काम असे. यात त्यांनी भव्यता देण्याचा प्रयत्न केला. मृत्यूंजय शंकराची आरास ही विशेष होती. यात पहिल्यांदाच शहरात चलचित्र स्वरूपाचा देखावा होता. सुमारे सहा फूट उंचीच्या महादेवाची मूर्ती चार कळश्या घेऊन स्नान करत होती. यात प्रत्यक्ष पाण्याचा वापर केला गेला होता. हा देखावा आजही लोकांच्या स्मरणात आहे. पुढे ‘पीओपी’च्या वाढत्या मागणीमुळे कारखाना बंद पडला. त्यानंतर त्यांनी राजकीय पुतळे बनविण्याकडे लक्ष दिले. मग सरकारने या पुतळ्यांवर बंदी आणली. या बंदीमुळे आता त्यांनी गृहसजावटीकडे मोर्चा वळवला. हे सर्व करत असताना मूर्ती तयार करण्याचे काम त्यांनी पूर्णपणे बंद केलेले नाही. अजूनही मोजके पण कल्पक गणपती ते तयार करतात. यंदा न्यू ईरा शाळेसाठी त्यांनी ईको फ्रेंडली गणपती तयार केला आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपातील बाप्पा त्यांनी साकारले आहेत. यात बाप्पा ज्ञानेश्वरी लिहित आहेत. तर बाजूला ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनातील कथा मांडण्यात आल्या आहेत. आज शिल्पकामाच्या जोडीला स्मृती चिन्हे, व्हीआयपी स्मृतीचिन्हे, ही कामेही ते करतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा