अनेकांना अनेक सवयी असतात मात्र आपल्या कमाईतील काही रक्कम खर्ची घालत व आर्थिक झळ सोसत पनवेल येथील ८२ वर्षीय मधू पाडळकर यांनी हजारो ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह केला आहे. ऐतिहासिक वस्तूंचे जतन करून संस्कृती जपणाऱ्या या अवलियाने तब्बल ६३ वर्षे यासाठी खर्ची घातली आहेत. त्याकरिता त्यांनी आपल्या घरातच या वस्तूंचे संग्रहालय उभारले आहे.
पनवेल शहरातील म्हात्रे अॅक्संड रुग्णालयाशेजारी असलेल्या परीस या बंगल्यात मधू पाडळकर यांचे हे संग्रहालय आहे. बंगल्यात प्रवेश करताच विविध प्रकारच्या दगडी वस्तूंचे दर्शन होते, यामध्ये प्रामुख्याने विविध प्रकारच्या जात्यांचा तसेच दगडी उखळींचा समावेश आहे. त्याचप्रमाणे पुराण काळातील दगडाचे दिवे, दगडी आंघोळीची पात्रही आहेत. तर घरात प्रवेश करताना असलेल्या प्रवेशद्वाराजवळच विविध प्रकारचे लोखंडी, तांबे, पितळेचे दिवे, ढाली तलवार आदी निदर्शनास येतात.
न्यायालयात शिरस्तेदार असलेल्या मधू पाडळकर यांनी अनेक ठिकाणावर भ्रमंती करून भंगारातून तसेच पदपथावरून या वस्तूचा संग्रह केला आहे. त्यांच्या या ऐतिहासिक संग्रहाला काही वर्षांपूर्वी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी भेट दिलेली होती. आपल्या मागे आपला नातू लोकेश यांनी या संग्रहाचे जतन करून त्यात वाढ करावी व आपल्या संस्कृतीची माहिती पुढील पिढीला द्यावी, अशी इच्छा मधू पाडळकर यांनी व्यक्त केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा