‘ठाणे म्युझिक फोरम’ तर्फे  ठाण्यातील संगीत कलाकारांचे अलीकडेच आयोजित करण्यात आलेले ‘युनिटी’ हे संमेलन मोठय़ा उत्साहात संपन्न झाले. पं. ए. के. अभ्यंकर, पं. भाई गायतोंडे, श्रीराम देव, दादा तेलवणे यांच्याहस्ते या संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. येथील सहयोग मंदिर सभागृहात हे तीन दिवसीय संमेलन आयोजित          क रण्यात आले होते.
संमेलनाच्या पहिल्यादिवशी नवोदित गायकांचा ‘आश्वासक सूर’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.  यानंतर महाशिवरात्रीनिमित्त आयोजित ‘शिवस्तुती’ या कार्यक्रमात उपस्थित कलाकारांनी रागदारी बंदीशी आणि विविध रचनांचे सादरीकरण केले. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी जागतिक महिलादिनानिमित्त स्त्री कलाकारांचा ‘सखी री’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी महिला कलाकारांनी रागदारी आणि भावसंगीताचे सादरीकरण केले. तिसऱ्या दिवशी ‘सहवादन’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पं. मारुती पाटील यांनी सतारवादन, अनंत जोशी यांनी संवादिनीवादन, विवेक सोनार यांनी बासरीवादन आणि किशोर पांडे यांनी तबलावादनाचा कार्यक्रम सादर केला. यानंतर
‘संगीतभूषण एक स्मरण’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पं. राम मराठे यांच्या स्मृतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. संमेलनात आयोजित विविध कार्यक्रमांचे सूत्रसंचालन वासंती वर्तक आणि धनश्री लेले यांनी केले. अनंत जोशी आणि शशांक दाबके यांनी संमेलनाच्या आयोजनात महत्वाची भूमिका बजावली.

Story img Loader