प्रख्यात कथ्थक नर्तक पं. राजेंद्र कुमार गंगाणी, गायिका कौशिकी चक्रवर्ती आणि राकेश एंड फ्रेंड्स फ्युजन गटाचे बासरीवादक राकेश चौरसिया, ड्रमवादक जिनो बँक्स, तबलावादक सत्यजित तळवळकर, बासरी गिटारवादक शेल्डन डिसिल्वा आणि कीबोर्डवादक संगीत हल्दीपूर या दिग्गज कलावंतांचा स्वर, ताल आणि नृत्याचा नजराणा ठाणेकरांना सप्तसूर महोत्सवाच्या निमित्ताने अनुभवता आला. ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाटय़गृहामध्ये पार पडलेल्या या महोत्सवाला कलाप्रेमी रसिकांची मोठी उपस्थिती होती.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी कथ्थक नर्तक राजेंद्र कुमार गंगाणी यांच्या नृत्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. शिवस्तुती, पारंपरिक, गुरू भजन या रागांभोवती गुंफलेला नृत्याविष्कार करत राजेंद्रकुमार यांनी तबलावादक कालिनाथ मिश्रा यांच्या सोबतच्या जुगलबंदीने प्रेक्षकांना मोहिनी घातली. त्यानंतर गायिका कौशिक चक्रवर्ती यांनी अभोगी, धृत, तीनताल या तीन रागांचे गायन केले. प्रसिद्ध तबलावादक सत्यजित तळवळकर आणि हार्मोनियम वादक अजय जोगळेकर यांच्या साथीने कौशिकी यांनी गायलेल्या ‘याद पिया कि आये’ या गाण्याने रसिकांची दाद घेतली. दुसऱ्या दिवशी युवा संगीतकार राकेश चौरसिया यांच्या नेतृत्वाखाली राकेश एंड फ्रेंड्स ग्रुपच्या जिनो बँक्स, सत्यजित तळवळकर शेल्डन डिसिल्वा आणि संगीत हल्दीपूर यांच्या दमदार कलाविष्काराने संगीत रसिकांना सुरांची मेजवानी मिळाली.
भारतीय शास्त्रीय आणि पाश्चिमात्य संगीत यांच्या मिश्र संगीताचा मिलाप सादर केला. भारतीय संगीताचा प्रसार व्हावा आणि युवा कलाकारांना त्यातून प्रेरणा मिळावी यासाठी गेल्या चार वर्षांपासून सप्तसूर महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. अशी माहिती रेणू सोमन यांनी या वेळी दिली.  

Story img Loader