शब्द हा गदिमांना धर्म होता तर संगीत हा बाबुजी अर्थात सुधीर फडके यांचा ध्यास होता. स्वर, चाल, शब्द कसे आळवावे हे गदिमा आणि बाबुजींना चांगले ठाऊक होते. त्यांना त्याची चांगली जाण होती, असे प्रतिपादन श्रीधर फडके यांनी बदलापूर येथे आयोजित कार्यक्रमात केले.
राघवेंद्र क्रिएशन्सच्या वतीने बदलापूर येथील अजयराजा सभागृहात गीतरामायणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी गीतरामायणातील अनेक अजरामर गाणी श्रीधर फडक्यांनी सादर केली. गीतरामायणाच्या निर्मितीला ५८ वर्षे झाली तरी रसिकांच्या मनावर त्याची छाप आजही आहे. गीतरामायणातील गीतांबरोबरच त्यांच्या निरुपणाचीही भुरळ उपस्थित रसिकांना यावेळी जाणवली. राघवेंद्र क्रिएशन्सचे अमित जोशी, प्रा. नितीन आरेकर, माधुर दवे आदींनी या कार्यक्रमाचे नियोजन केले. स्वये श्री राम प्रभू ऐकती, रघुराजाच्या नगरी जाऊन, गा बाळांनो श्रीरामायण अशा अजरामर गीतांचा आस्वाद रसिकांनी घेतला. राम जन्मला गं सखे, आकाशाशी जडले नाते, सेतु बांधारे सागरी या गीतांना रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.  

Story img Loader