पद्मविभूषण पं. शिवकुमार शर्मा आणि पद्मविभूषण पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या संतूर आणि बासरी वादनाने हजारो कल्याणकर रसिक नागरिकांची रम्य सकाळ या दोन दिग्गजांच्या सोलोवादनाने डोक्यावरील तळपत्या सूर्यापर्यंत केव्हा पोहचली हे कळलेच नाही. स्वतंत्रपणे सादरीकरण झालेल्या या दोन्ही कार्यक्रमांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.
कल्याणमधील अनंत वझे संगीत, कला, क्रीडा प्रतिष्ठानने म्हैसकर फाऊंडेशनच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे सावित्रीबाई फुले रंगमंदिरात आयोजन केले होते. संतूर वादनातील ध्वनिलहरी, सूर याचे प्रत्येकाने आत्मचिंतन केले तर हे स्वरसूर रसिकांना आपोआप ध्यानधारणा, विपश्यनेच्या अंतरंगात घेऊन जातात, असे पं. शिवकुमार शर्मा यांनी सांगून आपल्या कलाविष्काराला सुरुवात केली. संतूर सोलोवादनातून पं. शर्मा यांनी बैरागी भैरव, अहिर भैरव राग सादर करून रसिकांची वाहव्वा मिळविली.
संतूर वादनातील लहान-मोठे बारकाव्याप्रसंगी रसिकांच्या हदयाचा ठाव घेत होते. टिपेच्या वादनावेळी टाळ्या वाजवून दाद देण्यापेक्षा मन लावून त्या सुरांचा स्वाद घ्या असा सल्ला शर्मा यांनी दिल्याने रसिक निबिड अरण्यातील शांततेप्रमाणे या स्वरसुरांचा स्वाद घेत होते. तबलापटू पंडित विजय घाटे यांनी दमदारपणे मत्त, रूपक, ध्रुत रागाने साथ देऊन रसिकांची वाहव्वा मिळविली.
पं. हरिप्रसाद चौरसिया यांनी सोलो बासरी वादनातून सिद्धसारंग, दाक्षिणात्य हंसध्वनी, मुलतानी राग सादर करून रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळविली. त्यांना पखवाजवादक, तबलापटू घाटे यांनी तेवढय़ाच तोलाची साथ देऊन कार्यक्रमाची रंगत वाढविली. रसिकांकडून भरभरून प्रेम मिळणारा असा कार्यक्रम आपण प्रथमच पाहत आहोत, अशी प्रतिक्रिया यावेळी पं.चौरसिया यांनी सत्कारानंतर दिली. या कार्यक्रमाला म्हैसकर फाऊंडेशनच्या सुधाताई म्हैसकर, अनुया म्हैसकर, जगन्नाथ शिंदे, डॉ. दीपक वझे, डॉ. प्रताप पानसरे व इतर मान्यवर उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा