संगीतात काळानुरूप बदल होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पं. तुळशीदास बोरकर यांनी नुकतेच दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्र येथे केले. ज्येष्ठ हार्मोनियमवादक राजाभाऊ पटवर्धन यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभात पं. बोरकर बोलत होते.
राजाभाऊ पटवर्धन आणि माझी गेल्या चाळीस वर्षांपासून मैत्री असल्याचे सांगून पं. बोरकर म्हणाले की, माझे नाटय़क्षेत्र आणि पटवर्धन यांचे शास्त्रीय संगीत असे वेगळे प्रांत असले तरी एकूणच संगीतप्रेमामुळे आमचा स्नेहबंध जुळला. या वेळी बोरकर यांनी ‘पटदीप’, ‘तिलकदेस’ हे राग आणि ‘चांद माझा हसला’, ‘तीर्थ विठ्ठल’, ‘भैरवी’चे वादन केले. पं. बोरकर यांच्या हस्ते पटवर्धन यांनी एकलवादन केलेल्या ‘स्वर अमृत’ या संवादिनी वादनाच्या ध्वनिफितीचे प्रकाशन करण्यात आले.
केशवराव कोठावळे पारितोषिक
मॅजेस्टिक प्रकाशन आणि केशवराव कोठावळे पारितोषिक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने दादर (पश्चिम) येथील धुरू सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात मकरंद साठे यांना ज्येष्ठ समीक्षिका प्रा. पुष्पा भावे यांच्या हस्ते केशवराव कोठावळे पारितोषिक प्रदान करण्यात आले. रोख १५,१५१ रुपये असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे. या वेळी बोलताना प्रा. भावे म्हणाल्या की, मराठीत तीन खंडांमध्ये एक पुस्तक प्रसिद्ध होणे हीच वेगळी घटना आहे. समग्रलक्ष्यी इतिहासकाराची दृष्टी घेऊन साठे या पुस्तकाचे काम करत होते. इतिहासाच्या कल्पना आज बदलत असून सगळ्या घटनांच्या संदर्भातच रंगभूमीकडे पाहावे लागते. परिक्षक समितीच्यावतीने सुबोध जावडेकर यांनी आपले विचार व्यक्त केले. मकरंद साठे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. मॅजेस्टिक प्रकाशनचे अशोक कोठावळे यांनी प्रास्ताविक केले.
सावरकर स्मारकाचे विविध कार्यक्रम
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातर्फे येत्या २६ ते २८ मे या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २६ मे रोजी गिरिश जाखोटिया यांचे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर, दहशतवाद आणि २१ शतक’ या विषयावर व्याख्यान होणार असून २७ मे रोजी ‘स्वातंत्र्य रवी’ हा संगीतमय कार्यक्रम होणार आहे. २८ मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकातर्फे देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. हे सर्व कार्यक्रम स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात सायंकाळी साडेसहा वाजता होणार आहेत.
‘स्वररंग यात्री’चे प्रकाशन
मृदुला दामले लिखित ‘स्वररंग यात्री’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच कुंदा भावे यांच्या हस्ते एका कार्यक्रमात झाले. या कार्यक्रमास प्रसिद्ध व्याख्याते आणि प्रवचनकार डॉ. सच्चिदानंद शेवडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सर्वोत्तम प्रकाशनातर्फे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. या कार्यक्रमास मराठी रंगभूमीवरील कलाकार उपस्थित होते. निवेदिका मंगला खाडिलकर यांनी उपस्थित मान्यवरांशी संवाद साधला.  

Story img Loader