एरवी वर्षभर शास्त्रीय संगीताच्या मैफिली किंवा मराठी हिंदी गीतांचे कार्यक्रम होत असले तरी गेल्या आठ- दहा वर्षांत लखलखत्या दिवाळीचा उत्साह द्विगुणीत करणारा कार्यक्रम म्हणजे दिवाळी पहाट.. गुलाबी थंडीत पहाटेच्या या सांगीतिक फराळाचा आस्वाद रसिकांना देण्यासाठी यंदाही शहरात विविध संस्थांच्या वतीने दिवाळी पाडवा पहाट कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रारंभीच्या दिवाळी पहाटचे कार्यक्रम मुबंई आणि पुण्याला काळात आयोजित केले जात असताना लक्ष्मीनगरात संदीप जोशी यांनी नागपुरात याची मुहूर्तमेढ रोवली होती. त्यानंतर काही शहरातील मोजक्या संगीत एकत्र येऊन दिवाळीच्या पाच दिवसात मराठी हिंदी गीतांचे कार्यक्रम असे. गेल्या दोन तीन वर्षांत जणू गेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमाची शहरात जणू सूरमय लाट आली. विदर्भासह नागपुरातील गल्लीबोळामध्ये, मैदानांमध्ये वेगवेळ्या संस्थातर्फे दिवाळी पहाटच्या नावाखाली मंगलमय वातावरणात मराठी हिंदी गीतांचे कार्यक्रम होऊ लागले. शहरात अनेक नवोदित आणि काही प्रतिष्ठात गायक आणि वादक असून ते या कार्यक्रमाच्या निमित्ताने रसिकांसमोर येत असतात. या शहराने जसे गायक वादक तयार केले तसे संगीत रसिक तयार केले असून शहरात विविध ठिकाणी दिवाळीनिमित्त होणाऱ्या संगीतमय कार्यक्रमांना न चुकता हजेरी लावून कलाकारांचा उत्साह वाढवतानाच कार्यक्रमाचा आनंद घेत असतात.
इंडियन मेडिकल असोसिएनशतर्फे ११ नोव्हेंबरला सकाळी ७ वाजता दिवाळी पहाट मराठी हिंदी गीतांचा सुमधूर कार्यक्रम सादर होणार आहे. शैलेष दाणी यांचे संगीत संयोजन असलेल्या या कार्यक्रमात भाग्यश्री बारस्कर, गुणवंत घटवाई, सारंग जोशी आणि वैशाली उपाध्ये गीते सादर करणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन प्रकाश एदलाबादकर करणार आहेत.
झेप समाज जागृती संस्थेतर्फे ११ नोव्हेंबरला सकाळी ६ वाजता काँग्रेसनगरच्या न्यू इंग्लिश हायस्कूलच्या प्रांगणात दिवाळी पहाट कार्यक्रमाच्या निमित्ताने शास्त्रीय आणि सुगमसंगीत क्षेत्रातील प्रतिभासंपन्न गायक देवकी पंडित यांचा शास्त्रीय आणि सुगम संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रसिकांनी भारतीय वेषभूषेत या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन झेपचे प्रमुख संदीप जोशी यांनी केले आहे.
गोकुळपेठमधील हर्णे महिला समाजाच्या प्रांगणात शनिवारी १० रोजी सकाळी ६ वाजता मंगलमय पहाट कार्यक्रम आयोजित करण्यात आलाआहे. या कार्यक्रमात अमर कुळकर्णी सुरभी ढोमणे, यांच्यासह इतर कलावंत गीते सादर करणार आहेत. कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन संस्थेच्या अध्यक्ष वंृदा घरोटे यांनी केले आहे.
प्रतापनगरातील दुर्गादेवी सार्वजानिक देवस्थानात ११ नोव्हेंबरला सकाळी ६.३० वाजता स्वरधनू प्रस्तुत ‘दिवाळी सांज लावती मी निरांजन’ हा भक्तीसंगीत, सुगमसंगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.कार्यक्रमाची निर्मिती मीनाक्षी मोहरील यांची असून यात मोहिनी बरडे, मीनाक्षी मोहरील, विजय देशपांडे, अंजली देशमुख व गणेश ठमके गीते सादर करणार आहेत. या कार्यक्रमाला नागरिकांना उपस्थित राहावे असे आवाहन मंदिराचे अध्यक्ष गोपीकिसन तापडिया यांनी केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे ११ नोव्हेंबरला सकाळी ६ वाजता राष्ट्रभाषा संकुलाच्या बाबुराव धनवटे सभागृहात प्रहर सुरावट हा मराठी गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यात साधना शिलेदार, राहुल एकबोटे, रेणुका इंदूरकर, सुगंधा लातुरकर गीते सादर करणार आहे.
शिवाजी नगर नागरिक मंडळातर्फे धनत्रयोदशीला ११ नोव्हेंबरला शिवाजीनगर उद्यानात ‘मंगलमय पहाट’ या समुधूर मराठी हिंदी भाव भक्ती गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमात स्मिता जोशी, दत्ता हरकरे, मंजिरी वैद्य, निरंजन बोबडे गीते सादर करणार आहे. महापौर अनिल सोले यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे.
रेशीमबागेतील ‘कलासंगम’ संस्थेतर्फे १३ व १४ नोव्हेंबरला कीर्तन आणि पहाट वारा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १३ नोव्हेंबरला सकाळी ६ वाजता लातुरच्या कीर्तनकार स्मिता आजेगावकर यांचे नरकासूरचा वध या विषयावर कीर्तन होणार आहे. कार्यक्रमाचे निवेदन विजया मारोतकर करणार असून दीपक फडणवीस, मनीष शिरभाते आणि शिरीष भालेराव साथसंगत करणार आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता ‘पहाटवारा’ हा मराठी हिंदी गीतांचा कार्यक्रम सादर होणार आहे. यात निरंजन बोबडे, मंजिरी वैद्य, श्रीनिधी घटाटे आणि अक्षय हे गायक सहभागी होणार असून पंकज यादव, श्रीकांत पिसे साथसंगत करणार आहे. कार्यक्रमाचे निवेदन मुकूंद देशपांडे करणार आहेत.
चार भिंतीच्या आत बंदिस्त जीवन जगणाऱ्या बंदिवानांसाठी मध्यवर्ती कारागृहात १३ नोव्हेंबरला सकाळी ७ वाजता स्वरवेद संस्थेतर्फे मराठी हिंदी गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्राचा महागायक अनिरुद्ध देशपांडे यांच्यासह निरंजन बोबडे आणि मंजिरी वैद्य या कार्यक्रमात गीते सादर करणार आहे. कारागृहातील काही बंदीवान गायक हजेरी लावणार आहेत.
हनुमाननगरातील त्रिकोणी पार्कमध्ये सचिन ढोमणे यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली मराठी हिंदी गीतांचा कार्यक्रम सादर होणार असून यात सुरभी ढोमणे, अमर कुळकर्णी गीते सादर करणार आहे. या कार्यक्रमांच्या निमित्ताने शहराच्या सर्वच भागातील संगीतरसिकांना पाच सुरांची मेजवानी मिळणार आहे. अनेक गुणी गायक आणि वादक कलावंतांची या कार्यक्रमातून नागपूरकर रसिकांना नव्याने ओळख होणार आहे.