‘संगीत’ ही अशी गोष्ट आहे की ती धर्म, भाषा, पंथ, जात यांच्या पलिकडे जाऊन सर्वाना जोडते आणि एकत्र आणते. त्यामुळे संगीताला राष्ट्रभाषेचा दर्जा मिळावा, असे प्रतिपादन संगीतकार कौशल इनामदार यांनी नुकतेच लालबाग येथे केले.
विद्यार्थी उत्कर्ष मंडळातर्फे आयोजित विवेकांनद व्याख्यानमालेचा समारोप इनामदार यांच्या व्याख्यानाने झाला. त्यावेळी ते बोलत होते. ‘लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी’ या विषयावर त्यांनी आपले विचार मांडले.
काहीतरी चांगले करण्यासाठी संवेदनेची गरज असते. त्यासाठी प्रतिकूल परिस्थिती वरदान ठरू शकते. त्यामुळे चांगले निर्माण करण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन करून इनामदार यांनी सांगितले की, इंग्रजी साहित्य उत्कृष्ट असले तरी मराठी साहित्याचा आपल्या आयुष्याशी थेट संबंध असतो.
मराठी मुलांमध्ये भीड आणि न्युनगंड असल्याने कोणतीही गोष्ट ते सादर करू शकत नाहीत, अशी खंतही इनामदार यांनी व्यक्त केली.
अर्थव्यवस्था सुदृढ व्हावी-गिरीश कुबेर
या व्याख्यानमालेत ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांचे ‘अगबाई महागाई-महागाईच्या कारणांचा वेध’ या विषयावर व्याख्यान झाले. कुबेर यांनी सांगितले की, आपली अर्थव्यवस्था सुदृढ आणि सक्षम करण्याची गरज आहे. महागाई हा सर्व घटकांना व्यापून राहिलेला आणि त्रास देणारा विषय आहे. महाागईच्या मुळाशी ‘हायड्रोकार्बन’ हा घटक असून ८२ टक्के इंधन आपल्याला आयात करावे लागते. तेल आयातीवरच सर्वात जास्त खर्च होतो.
साठेबाजी, अज्ञान आणि व्यवस्थेतील तफावत आदी महाागईच्या कारणांचा वेध कुबेर यांनी घेतला. प्रत्येकाने अर्थव्यवस्था समजून घेऊन तिला भिडण्याचा प्रयत्न करावा. तसेच आपले उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने छोटी-छोटी गुंतवणूक करणे गरजेचे असल्याचेही कुबेर यांनी सांगितले.
आपली विचारसरणी, जीवन तत्वज्ञान संकुचित झाले असून ‘अंथरूण पाहून पाय पसरावेत’ या म्हणीमुळे आपण प्रगती आणि विकासापासून वंचित राहिल्याचे मतही कुबेर यांनी या वेळी व्यक्त केले.
कवितेतील भावनांमुळे संस्कार-विसूभाऊ बापट
कवितेतील भावना जाणून घेतल्या की संस्कार होतात, असे मत ‘कविता घडवी संस्कार’ या विषयावर बोलताना प्रा. विसुभाऊ बापट यांनी व्यक्त केले. बहिणाबाई चौधरी, साने गुरुजी, रामदास स्वामी आदींचे श्लोक, गाणी यांनी विद्यार्थ्यांचे जीवन संस्कारमय केले असल्याचेही ते म्हणाले. विविध मराठी गाणी, श्लोक, ओव्या, कविता सादर करून प्रा. बापट यांनी जीवनातील संस्काराचे महत्व सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा