जयप्रकाश नगरात दत्तजंयती उत्सवात सादर करण्यात आलेला ‘स्वरझंकार’ हा विस्मृतीत गेलेल्या दर्जेदार गीतांचा कार्यक्रम मनाला उभारी देणारा ठरला. या कार्यक्रमाला रसिकांनीही तेवढय़ाच उत्स्फूर्तपणे दाद दिली.
नृत्य, नाटय़ व चलचित्रांद्वारे सादर करण्यात येणाऱ्या सद्गुरुदास महाराज रचित गीतांची भूमिका वर्षां वेलंकीवार यांनी निवेदनातून स्पष्ट केली. शारदास्तवनाने कार्यक्रम प्रारंभ झाला. या गीतावर शिवानी साठे यांनी नृत्य सादर केले. शेगावीचा राणा धाव आता.. अशी आळवणी गार्गी देशपांडे हिने नृत्यातून केली.
‘सूर्यपुत्र कर्ण’ ही व्यक्तिरेखा सखाराम सबनवीस यांनी साकारली. समीर पाडे, केशव देशपांडे, श्री व सौ गायकवाड यांच्या छोटय़ा भूमिकाही मनाचा ठाव घेऊन गेल्या. सिंदखेडराजा येथे साजरा झालेला जिजामाता जन्मोत्सव सोहळा दुर्मीळ चलचित्रांद्वारे पुन्हा मनपटलावर कोरल्या गेला. चैताली तुंगार व सहकाऱ्यांनी ‘पुण्यश्लोका शिवसरूपा महाराष्ट्र भूपती’ हे गीत सादर केले. शंभूराजांची भूमिका आल्हाद वेलंकीवार यांनी तर औरंगजेबांची भूमिका  अभिषेक काकड यांनी साकारली. वैष्णवी पेंडसे, सिद्धी देशमुख, श्रेयांगी दामले, वैदेही डबले यांनी नृत्य सादर केले. कार्यक्रमाला विभागीय माहिती संचालक भि.म. कौसल प्रामुख्याने उपस्थित होते.