जिल्हा परिषदेच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात यावी, कुठलीही तक्रार नसतांना मुख्याध्यापक इंगळे यांचे केलेले निलंबन तत्काळ रद्द करण्यात यावे, घरकुल घोटाळा व सर्वशिक्षा अभियानातील अनियमिततेची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, यासह इतर मागण्यांसाठी जिल्हा परिषदेवर डफडे मोर्चा काढण्यात आला.
मोर्चाचे नेतृत्व प्रदीप नागरे यांनी केले होते. या मोर्चात शेकडो महिला व पुरुष सहभागी झाले होते. यावेळी जिल्हा परिषद प्रशासनाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करून मोर्चेकऱ्यांनी परिसर दणाणून सोडला होता. त्यानंतर शिष्टमंडळातर्फे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
त्यात जि.प.मार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांची अंमलबजावणी होत नसल्याने ग्रामीण भागाचा विकास खुंटला आहे, प्रशासनाच्या नियोजनशुन्य कारभारामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे.
प्रशासनाच्या कामामध्ये तत्परता आणून ग्रामीण भागाचा विकास करण्यात यावा, तसेच कुठलीही चूक अथवा पालकाची तक्रार नसताना धोत्रा नंदई येथील आदर्श शिक्षक अशोक इंगळे यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांचे निलंबन हे राजकीय द्वेषापोटी करण्यात आले आहे.
त्यामुळे त्यांचे निलंबन तत्काळ रद्द करण्यात यावे, घरकुल घोटाळा, सर्वशिक्षा अभियानातील अनियमितता, कर्मचाऱ्यांच्या कामचुकाराबाबत तक्रारी देण्यात आल्या होत्या, परंतु अद्याप त्यावर कुठलीच कारवाई करण्यात आली नाही. त्यावर पाच दिवसांच्या आत योग्य निर्णय घेऊन चुकीची कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या सविता मुंढे, बाबुराव नागरे, अशोक इंगळे, शाळा समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरपंचासह नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Story img Loader