मुंबईकरांचा प्रवास सुलभ व्हावा, यासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांत दुवा निर्माण होण्याच्या गरजेतून मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणाची (एमआरव्हीसी) स्थापना झाली. एमआरव्हीसीने मुंबईकरांसाठी ‘मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट’ या नावाखाली तीन टप्प्यांत एक प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पाचा पहिला टप्पा २०११मध्ये पूर्ण झाला. तर दुसऱ्या टप्प्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प अद्यापि अपूर्णावस्थेत आहेत. या प्रकल्पांमध्ये दिवा-ठाणे (पाचवी-सहावी मार्गिका), मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस-कुर्ला (पाचवी-सहावी मार्गिका), मुंबई सेंट्रल-बोरिवली (सहावी मार्गिका), हार्बर मार्गाचे अंधेरी-गोरेगाव विस्तारीकरण, हार्बर मार्गावर १२ डब्यांच्या गाडय़ा, नव्या गाडय़ांचे ८६४ डबे आदी विविध प्रकल्पांचा समावेश आहे. हे प्रकल्प निम्मेही पूर्ण झाले नसताना रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मुंबईकरांना तब्बल ११४०० कोटी रुपयांच्या एमयूटीपी-३ या प्रकल्पाचे गाजर दाखवले आहे. या प्रकल्पाचे लोकार्पण झाले नाही, तोच खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मागणीनुसार ‘एमयूटीपी-४’ चा आराखडा तयार करण्याचे आदेश देत रेल्वेमंत्री प्रभू यांनी या चौथ्या टप्प्याचीही घोषणा केली आहे. मुळातच दुसऱ्या टप्प्यातील सर्वच महत्त्वाचे प्रकल्प अद्यापि पूर्ण होणे बाकी असताना त्यापुढील दोन टप्प्यांतील प्रकल्पांचे गाजर मुंबईकरांना दाखवण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यातील काही महत्त्वाच्या प्रकल्पांच्या सद्य:स्थितीचा हा लेखाजोगा..

मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस- कुर्ला (पाचवी-सहावी मार्गिका)
मध्य रेल्वेमार्गावरील प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाच्या या प्रकल्पाची सुरुवात होण्यासाठीच पुढील दीड ते दोन वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. सध्या हा प्रकल्प सर्वेक्षणाच्या स्थितीत आहे. हा प्रकल्प एमआरव्हीसी मध्य रेल्वेच्या माध्यमातून राबवत आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे सर्व काम मध्य रेल्वे करणार आहे. हा प्रकल्प दोन टप्प्यांत करण्यात येईल, असे मध्य रेल्वेतर्फे सांगण्यात आले होते. त्यापैकी पहिला टप्पा कुर्ला ते परळ यांदरम्यानचा असेल. तर दुसरा टप्पा परळ ते मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस असा असेल. या दुसऱ्या टप्प्यात रेल्वेमार्गाजवळ मोकळी जागा मिळणे शक्य नाही. मशीद व सँडहर्स्टरोड या स्थानकांदरम्यान अनेक व्यावसायिक तसेच निवासी इमारती असल्याने येथे दोन नव्या मार्गिका टाकणे कितपत शक्य होईल, याची शक्यता पाहणी सध्या चालू आहे. त्याऐवजी हार्बर मार्ग डॉकयार्डवरून बॅलार्ड पीयर भागाकडे वळवून सध्याचा हार्बर मार्ग सँडहर्स्टरोड ते मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस यांदरम्यान पाचवी-सहावी मार्गिका म्हणून वापरण्याचीही एक कल्पना आहे. मात्र या सर्व कल्पना शक्याशक्यतेच्याच पातळीवर आहेत. दरम्यान, परळ-कुर्ला या तथाकथित पहिल्या टप्प्याचे कामही कागदोपत्रीच सुरू आहे. या प्रकल्पाचे काम प्रत्यक्षात सुरू होण्यासाठी किमान एका वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प पुढील किमान तीन वर्षांत पूर्ण होणे शक्य नाही.

ठाणे-दिवा (पाचवी-सहावी मार्गिका)
नव्या युती सरकारमधील सर्वच खासदार रेल्वेच्या प्रश्नांबाबत प्रचंड जागरूक आहेत. मात्र त्यातही ठाणे आणि त्यापल्याडच्या खासदारांना रेल्वे प्रश्नांबाबत विशेष जिव्हाळा आहे. मात्र, युती सरकार सत्तेत येऊन एक वर्ष पूर्ण झाले, तरीही अद्यापि ठाणे-दिवा यांदरम्यानच्या पाचव्या-सहाव्या मार्गिकेचे काम ‘मागील पानावरून पुढे’ याच पद्धतीने चालू आहे. एमआरव्हीसीतर्फे चालू असलेल्या या कामात प्रामुख्याने कळवा-मुंब्रा यांतील अनधिकृत झोपडय़ांचा अडथळा येत आहे. या अनधिकृत घरांतील रहिवाशांना घरे मिळवून देण्यासाठी स्थानिक आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी आंदोलनही केले. मात्र अद्यापि हा प्रश्न निकालात लागलेला नाही. त्याचप्रमाणे मुंब्रा स्थानकाच्या पूर्व बाजूने जाणारा रस्ता कळव्याच्या दिशेने पुढे नेण्यासाठी एक पूल बांधणे आवश्यक आहे. हा पूल बांधण्याचे काम सुरू आहे. मात्र या बांधकामावर देखरेख करणाऱ्या अभियंत्याच्या मते हे पुलाचे काम पूर्ण होण्यास अजून वर्षभराचा अवधी लागणार आहे. त्यानंतर या पुलाखालून दोन रेल्वेमार्गिका टाकल्या जातील. कळवा-मुंब्रा यांदरम्यानच डोंगर फोडून एक बोगदा बांधण्याची गरज होती. हा बोगदा गेल्या वर्षांपासून तयार झाला आहे. मात्र त्या बोगद्याच्या आगेमागे गेल्या वर्षभरात फार काहीच काम झालेले नाही. एमआरव्हीसीने मुंब्रा आणि कळवा या दोन्ही स्थानकांतील पादचारी पूल नव्या मार्गिकांचा विचार करून पुढपर्यंत वाढवून ठेवले आहेत. मुंब्रा-दिवा या स्थानकांदरम्यान पश्चिमेला एमआरव्हीसीने जमीन मोकळी करून ठेवली आहे. तेथे जमीन सपाट करण्याचे कामही जोरात सुरू आहे. मात्र कळवा-ठाणे या स्थानकांदरम्यान या कामाने अद्यापि गती घेतलेली नाही.

मुंबई सेंट्रल-बोरिवली (सहावी मार्गिका)
मध्य रेल्वेच्या मानाने पश्चिम रेल्वेची आखणी मुंबई विभागात तरी सरळ आणि सुटसुटीत आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील वाहतुकीत फार अडथळे येत नाहीत. पण प्रकल्प पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने पश्चिम रेल्वेही मध्य रेल्वेच्याच जवळपास आहे. या मार्गावरील लांब पल्ल्यांच्या गाडय़ांना वेगळी मार्गिका उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई सेंट्रल-बोरिवली या स्थानकांदरम्यान सहावी मार्गिका टाकण्याचे काम पश्चिम रेल्वेने एमयूटीपी-२ अंतर्गत हाती घेतले होते. प्रत्यक्षात या मार्गावरील पाचवी मार्गिकाही पूर्ण झालेली नाही. या मार्गिकेच्या वांद्रे-सांताक्रुझ यांदरम्यानच्या एका टप्प्यावर स्थानिकांनी आक्षेप नोंदवला असून हे प्रकरण प्रलंबित आहे. तर सहाव्या मार्गिकेचे बांधकामही अजून हाती घेण्यात आलेले नाही. यात वांद्रे येथील एक रहिवासी इमारत, अंधेरी-पार्ले यांदरम्यानची जागा आदी विविध ठिकाणी अडथळे आहेत. तसेच मुंबई सेंट्रल-माहीम यांदरम्यानही जागेच्या कमतरतेमुळे ही मार्गिका कचाटय़ात सापडली आहे. या मार्गिकेचे काम सुरू झाल्यानंतरच ती कधीपर्यंत पूर्ण होईल, याबाबत अंदाज बांधता येईल.

Story img Loader