सिडकोने ४५ वर्षांपूर्वी उभारलेल्या या शहरात आजच्या घडीला देशाच्या विविध जाती, धर्म, पंथ, प्रांतांमधून आलेले नागरिक गुण्यागोविंदाने राहत आहेत, पण शहराशी हवी अशी बांधीलकी या नागरिकांची नाही असे दिसून येते. पालिकेनेही ही बांधीलकी निर्माण करण्याचा गेल्या वीस वर्षांत प्रयत्न केलेला नाही. शहराचा सांस्कृतिक, सामाजिक चेहराच तयार झालेला नाही. सिडकोने बांधलेले भावे नाटय़गृह ताब्यात घेतल्यानंतर आपली जबाबदारी संपली, असे पालिकेला वाटत असेल तर ते योग्य नाही. शहरातील अठरापगड जातींच्या लोकांसाठी एक सर्वव्यापी कला अ‍ॅकॅडमी असायला हवी असे माझ्यासारख्या कलाकाराला वाटत आहे. सिडकोने हे शहर उभारताना काही गोष्टी केलेल्या आहेत म्हणूनच आज ४६ टक्के जमीन मोकळी आहे. त्यात १९९ पेक्षा जास्त उद्याने आहेत. ती शहराची प्राणवायू झाली आहेत. राज्यात कामानिमित्ताने फिरल्यानंतर लक्षात येते की, नवी मुंबईत ठोस असे सामाजिक- सांस्कृतिक घडत नाही. ही खंत सारखी मनाला खात राहात आहे. त्यामुळे पालिकेने सर्व कलांना एक व्यासपीठ निर्माण होईल अशी निर्मिती करण्याची आवश्यता असून गटर, मीटर, वॉटर याच्या पलीकडे जाऊन नगरसेवकांनी ही मागणी लावून धरायला हवी असे मला वाटते. माझा जन्म येथील एका गावात (गोठवली) झाला असल्याने या शहराचा जन्म, बालपण, तारुण्य जवळून पाहिले आहे. त्यामुळे करण्यासारखे खूप आहे असे नेहमी वाटते. पालिका, आमच्यासारखे नागरिक आणि आपण निवडून देणारे नगरसेवक या शहराची ओळख निर्माण करणारे आयकॉन तयार करतील अशी अपेक्षा करू या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रवी वाडकर, जलशिल्पकार