उपराजधानीचे वैभव असलेल्या नाग नदीचा आता नाला झाला आहे. या नदीचे पाणी कधी काळी पिण्यासाठी वापरले जात होते, मात्र आता ते माणसांसाठीच नव्हे तर पाण्यातील जिवाणूंसाठीसुद्धा घातक झाले आहे, असे धक्कादायक तथ्य शिवाजी विज्ञान महाविद्यालयातील बी. एससी.च्या द्वितीय वर्षांच्या विद्यार्थ्यांनी सर्टिफिकेट कोर्स इन इन्व्हार्रमेंटल अ‍ॅनालिसीस अंतर्गत केलेल्या संशोधनात समोर आले आहे.
या महाविद्यालयातील ऋतुजा मोहिते, श्रीरंग मुद्दलवार व इतर विद्यार्थ्यांनी डॉ. अशोक आवळे, डॉ. आर.यू. खोपे व प्रा. मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन केले. काही आंतरराष्ट्रीय मासिकांमध्ये प्रकाशित करण्यासाठी ते पाठविण्यात येणार आहे. संशोधन प्रकल्पादरम्यान त्यांनी शहरातील पाण्याच्या स्त्रोतांवर लक्ष केंद्रित केले. यात नाग नदीचाही समावेश होता. नाग नदीच्या पाण्याची अल्कलीनिटी, रंग, गंध, तापमान, डिझॉल्ड ऑक्सिजन, बॉयलाजिकल ऑक्सिजन डिमांड व केमिकल ऑक्सिजन डिमांड आणि इतर बाबींचा अभ्यास केला. क्लोरीन हा डिसइन्फोक्टंट म्हणून काम करतो. यामुळे पाणी प्रदूषित होण्यापासून वाचविता येते, मात्र नाग नदीच्या पाण्यात क्लोरीनची कमतरता तीव्रतेने जाणवते, अशी माहिती श्रीरंग मुद्दलवारने दिली.
कोणत्याही पाण्याच्या स्रोताबाबत बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड आणि केमिकल ऑक्सिजन डिमांड हे अत्यंत महत्त्वाचे घटक मानले जातात. नाग नदीचा बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड हा अपेक्षेपेक्षा फारच कमी आढळून आला. या घटकाचा पाण्यातील जिवाणूंच्या क्रियांवर फरक पडतो. सामान्यत: हा घटक ५ युनिट असणे अपेक्षित असते, मात्र नाग नदीच्या बाबतीत हा ०.३ म्हणजे फारच कमी आढळून आला. केमिकल ऑक्सिजन डिमांडमुळे पाण्याचे प्रदूषण किती झालेले आहे, हे मोजता येते. याबाबतीतसुद्धा नाग नदीची दुरवस्थाच आहे, अशी माहिती ऋतुजा मोहितेने दिली. या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.के. बुरघाटे व या विषयाचे समन्वयक प्रा. आर.यू. खोपे, डॉ. डी.सी. सिंधीमेश्राम, रसायनशास्त्र विभाग प्रमुख व प्राध्यापकांनी अभिनंदन केले.

Story img Loader