शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्याचे वृत्त नगर शहरात सायंकाळी समजताच अनेक शिवसैनिकांना हुंदके अनावर झाले. बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार उत्स्फूर्तपणे बंद ठेवून लढवय्या नेत्यास श्रद्धांजली अर्पण केली. भिंगारमध्येही बंद पाळण्यात आला. शहरात सर्वपक्षीयांनी, संघटना व संस्थांनी ठिकठिकाणी श्रद्धांजली अर्पण करणारे फलक लावले. ठाकरे यांच्या पार्थिवाच्या दर्शनासाठी सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते रात्रीच मुंबईस रवाना झाले.
ठाकरे यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळताच त्यांच्या भेटीसाठी पदाधिकारी, कार्यकर्ते दोनच दिवसांपूर्वी मुंबईत गेले होते. जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे (दक्षिण), रावसाहेब खेवरे (उत्तर), नगरसेवक व माजी जिल्हाप्रमुख अंबादास गाडे, नगर तालुकाप्रमुख संदेश कार्ले आदींनी आजच पक्षाचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेऊन नगरकडे परतत असताना लोणावळ्याजवळ त्यांना ही घटना समजली, ते तसेच पुन्हा मुंबईकडे रवाना झाले.
सायंकाळी साडेचारच्या सुमारास ठाकरे यांच्या निधनाचे वृत्त पसरले. सकाळी ठाकरे यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती मिळाल्यानंतर शिवसैनिक व नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता. मात्र, सायंकाळी दु:खद घटना कळताच लगेच वृत्तपत्रांच्या कार्यालयात दूरध्वनी करुन व टीव्ही चॅनेलकडे धाव घेऊन त्यांची खातरजमा केली. माहिती मिळाल्यानंतर प्रमुख बाजारपेठेत शोककळेचे वातावरण निर्माण झाले.
पक्षाचे कार्यालय असलेल्या नेता सुभाष चौकात कार्यकर्ते व नागरीकांनी गर्दी केली होती. चौकात ठाकरे यांची मोठी प्रतिमा ठेवून श्रद्धांजली वाहण्यात आली. महापौर शिला शिंदे, आमदार अनिल राठोड, भगवान फुलसौंदर, दिपक सूळ यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. ठाकरे अमर रहे, अशा घोषणाही दिल्या जात होत्या.
चौकातच शांती इलेक्ट्रीकल्सचे राजू ढेरे यांनी प्रोजेक्टरच्या मोठय़ा पडद्यावर टीव्ही चॅनल्सवरुन केले जाणारे ठाकरे यांच्यावरील प्रक्षेपण दाखवण्याची व्यवस्था केली होती. श्रद्धांजली अर्पण करताना महापौर शिंदे यांच्यासह अनेकांना हुंदके अनावर झाले होते. व्यापाऱ्यांनीही आपले व्यवहार उत्स्फर्तपणे बंद ठेवून आदरांजली वाहिली.
संग्रहित लेख, दिनांक 18th Nov 2012 रोजी प्रकाशित
नगर व भिंगारला बंद, शिवसैनिकांना हुंदके अनावर
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्याचे वृत्त नगर शहरात सायंकाळी समजताच अनेक शिवसैनिकांना हुंदके अनावर झाले.

First published on: 18-11-2012 at 02:30 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagar and bhingar closed