लेट लतीफ तहसीलदारास नोटीस
वीजचोरीबाबत दोघांना अटक
वसमत नगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या मीटरमधून वीज चोरून वापरल्याबाबत वसमत पोलिसांनी दोघांना अटक केली, तर या प्रकरणी पालिकेच्या ३ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. दुसऱ्या कारवाईत सुवर्णजयंती राजस्व अभियानांतर्गत कार्यक्रम अंमलबजावणीत दुर्लक्ष केल्याबद्दल हिंगोलीचे प्रभारी तहसीलदार जी. एल. जाधव यांना कारणे दाखवा नोटीस बजावली, तर माळहिवरा गावचे तलाठी के. एन. पोटे यास निलंबित करण्यात आले.
चोरून वीज वापल्याप्रकरणी वसमत पालिकेच्या तक्रारीवरून शेख विखार शेख गफार, शेख इम्रानखाँ शेख बारीखाँ या दोघांना गुन्हा नोंदवून अटक झाली. या प्रकरणास जबाबदार धरून पालिकेच्या अ. रहेमान चाऊस, डी. जी. गायकवाड व बी. एम. खंदारे या ३ कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याची माहिती मुख्याधिकारी श्रीनिवास कोतवाल यांनी दिली. पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रास २४ तास वीजपुरवठा होतो. मात्र, केंद्रातून काही जण झेरॉक्स, केबल चालविण्यासाठी व इतर खासगी व्यवसायासाठी चोरून विजेचा वापर करीत असल्याचा प्रकार निदर्शनास आला. पालिकेचे कर्मचारी हरिहर पांडुरंग गवळी यांच्यामार्फत पोलिसात तक्रार देण्यात आली.
माळहिवरा गावात सुवर्णजयंती राजस्व अभियानांतर्गत विविध प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमाचे आयोजन गुरुवारी केले होते. मात्र, सकाळी ११ वाजताचा कार्यक्रम असताना तहसीलदार जाधव, मंडळ अधिकारी एस. एच. कांबळे, तलाठी के. एन. पोटे उशिराने तेथे आले. परंतु वेळेवर दाखल झालेल्या उपविभागीय अधिकारी रवींद्र पवार यांना या वेळी इतरांची मात्र प्रतीक्षा करत थांबावे लागले. या कार्यक्रमाची कोणतीही पूर्वतयारी नव्हती. ग्रामस्थांची उपस्थितीही नगण्य होती. या प्रकाराची गंभीर दखल घेत पवार यांनी तहसीलदार जाधव यांना कार्यक्रम नियोजनात निष्काळजीपणा केल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली. वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणे, कर्मचाऱ्यांवर नियंत्रण न ठेवणे, या बाबत २४ तासांत उत्तर न दिल्यास कारवाईची तंबी दिली, तर तलाठी पोटे यास तडकाफडकी निलंबित केले. मंडळ अधिकारी कांबळे यांच्याविरुद्ध कारवाईचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविला.