पडझड झालेल्या तालमी, प्रशिक्षण केंद्र आणि प्रशिक्षकांचा अभाव, कुस्तीच्या बदलत्या तंत्राचा वेध घेण्याकडे वस्तादांचे झालेले दुर्लक्ष, स्पर्धेसाठी मैदानाचा अभाव, युवकांना आकर्षित करण्याकडे जिल्हा तालीम संघाने केलेले दुर्लक्ष अशा विविध कारणांतून गुणवत्ता असूनही नगरच्या कुस्तीची व मल्लांची उडी जत्रा-यात्रांच्या आखाडय़ापलिकडे जायला तयार नाही.
राज्य सरकारची प्रतिष्ठेची ‘स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा’ उद्यापासून (गुरूवार)नगरच्या वाडिया पार्क जिल्हा क्रीडा संकुलात होत आहे. बक्षिसांच्या रकमेत सरकारने यंदापासून भरघोस वाढ केलेली आहे. त्यामुळेही यंदा स्पर्धेत चांगल्या कुस्त्या व मल्लांचा सहभाग नगरकरांना पहावयास मिळेल. परंतु स्पर्धेतील विजेत्यांमध्ये नगरचे स्थान कोठे असेल, हा प्रश्नच आहे.
राज्य सरकारने यंदापासून स्पर्धेसाठी ५० लाख रुपयांची तरतूद केली आहे. मात्र, स्पर्धेच्या आयोजनाचा खर्च एक कोटी रुपयांपर्यंत जाईल, असे स्पर्धा आयोजन समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री बबनराव पाचपुते यांनीच जाहीर केले आहे. स्पर्धा होतील, त्यासाठी जमवलेला प्रचंड निधीही खर्च होईल, मात्र त्यानंतर काय? नगरच्या कुस्तीच्या जुन्या वैभवाला पुन्हा चालना मिळणार का, लाल मातीतील नगरच्या मल्लांना मॅटवरील बदलत्या तंत्राचे प्रशिक्षण उपलब्ध होणार का, त्यासाठी जिल्हा तालीम संघ, क्रीडा विभाग, तालमींचे स्थानिक वस्ताद काय करणार, या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत.
जुन्या जमान्यातील पै. रामचंद्र देवळालीकर, तुळशीराम दादा परदेशी, तवकल वस्ताद, किसनसिंग परदेशी, छबूराव लांडगे अशा अनेक नगरच्या पहेलवानांनी देशभर दबदबा निर्माण केला होता. ही परंपरा लुप्त झाल्यासारखी स्थिती आता आहे. नगरमध्ये गुणवत्ता आहे याची झलक महाराष्ट्र केसरी किताब मिळवून गुलाब बर्डे, अशोक शिर्के व अनिल गुंजाळ (उपविजेता) यांनी आणि यंदाही गोंदिया येथे झालेल्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत उपविजेतेपद मिळवून जिल्ह्य़ाने दाखवून दिली आणि देत आहेत. अंजली देवकरने तर जिल्ह्य़ाच्या महिला कुस्ती क्षेत्राचे नाव परदेशातही चमकवले. शहरात प्रसिद्ध अशा २९ व्यायामशाळा होत्या. देखभालीचा अभाव आणि पहेलवानांच्या प्रतीक्षेत त्यातील बऱ्याचशा पडल्या, काही चांगल्या स्थितीत असल्या तरी तेथे पहेलवानांच्या सरावांचे आवाज घुमताना दिसत नाहीत. काही अपवादात्मक तालमीत कुस्ती जीवंत असल्याचे दिसते. परंतु तेथेही योग्य प्रशिक्षक आणि बदलत्या तंत्राच्या प्रशिक्षणाचा अभावच आहे. क्रीडा विभागाने या तालमींचा जीर्णोद्धार करुन तेथे कुस्तीच्या बदलत्या तंत्राचे प्रशिक्षण मिळण्याची व्यवस्था करायला हवी, अशी मागणी एकेकाळच्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते व माजी नगराध्यक्ष शंकरराव घुले यांनी केली.
कुस्ती जागतिक पातळीवर स्वीकारली गेली ती केवळ मॅटमुळे. आता राज्य स्तरावरील सर्व स्पर्धाही मॅटवरच होऊ लागल्या आहेत. मॅटमुळे कुस्ती वेगवान झाली, नियम बदलले, राऊंड, गुण पद्धत आली परंतु अजूनही नगरमध्ये पारंपरिक पद्धतीनेच कुस्तीचे प्रशिक्षण दिले जाते. कोणत्याही तालमीकडे मॅट नाही, प्रशिक्षक नाहीत. ही उणीव दूर झाल्यास नगरमधील गुणवत्ता प्रकट होईल, अशी आशा भारतीय महिला संघाची कोच म्हणून काम पाहिलेल्या अंजली देवकरला वाटते.
सध्या जिल्हा तालीम संघ व क्रीडा विभाग अशा दोघांकडेच मॅट आहेत. काही अपवादात्मक कॉलेजच्या जिमखान्यातही आहेत. जिल्हा तालीम संघाच्या मॅटचा वापर अद्यापि झालेला नाही. क्रीडा विभागाच्या मॅटचा वापर केवळ शालेय स्पर्धापुरताच होतो. संघाचे स्वत:चे प्रशिक्षण केंद्र नाही की कोच नाही. कुस्तीसाठी क्रीडा विभागाकडे एकमेव कोच आहे, परंतु तो प्रशिक्षित नाही. कुस्तीसाठी ‘साई’ची (स्पोर्टस् अॅथॉरिटी ऑफ इंडिया) चक्क दोन केंद्र जिल्ह्य़ात आहेत. एक राजूर (अकोले) व दुसरे कोकमठाणला (कोपरगाव). मात्र त्याची माहितीच जिल्ह्य़ाला नाही. त्यासाठी निवड चाचणी केव्हा होते, हेही समजत नाही.
मुलांना कुस्तीकडे आकर्षित करण्यासाठी जिल्हा संघाकडे कोणतीही स्वत:ची योजना नाही, कुस्तीगीर परिषदही जिल्हा स्तरावर कोणतीच योजना राबवत नाही. शहरात मैदान भरवण्यासाठी आखाडाही नाही. वाडिया पार्क मैदानात १९५३ मध्ये कुस्तीप्रेमी किसनसिंग परदेशी यांनी पालिकेच्या माध्यमातून जंगी मैदान उभारले. नवे क्रीडा संकुल उभारताना ते जमीनदोस्त केले गेले. आता मैदान भरवण्यासाठी शहरात जागाच नाही, अशी खंत कुस्तीवर प्रेम करणाऱ्या व ती जतन करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या घराण्यातील वयोवृद्ध तुकाराम गोडळकर यांनी व्यक्त केली.
जिल्हा तालीम संघाने केवळ जिल्हा निवड चाचणी स्पर्धेसाठी संघ निवडण्याची जबाबदारी पार न पाडता प्रशिक्षण देणारी शिबिरे आयोजित करायला हवीत, बाहेरहून प्रशिक्षक बोलावून सराव व आहाराविषयी मार्गदर्शन द्यायला हवे, पहेलवानांना दत्तक घेण्यासाठी दानशूर व्यक्ती, संस्थांकडे प्रयत्न करायला हवेत, स्वत:चे प्रशिक्षण केंद्र सुरु करायला हवे, तरच नगरची मान कुस्ती क्षेत्रात उंचावेल. येथील मुलांचे कुस्ती प्रशिक्षणासाठी
कोल्हापूर, पुण्याकडे धाव घेण्याचे प्रमाण कमी होईल व जत्रा, यात्रेच्या आखाडय़ात रुतलेल्या कुस्तीच्या कक्षा
रुंदावतील, अशी सूचना कुस्तीचे कोच संतोष भुजबळ यांनी केली आहे.
जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संघास स्वत:चे उत्पन्न नसल्याने उपक्रम राबवण्यावर मर्यादा पडत असल्याचे सांगितले. मैदान उभारण्यासाठी प्रयत्न करुनही महापालिका जागा देत नाही, मनपाकडे इतर सर्व कारणांसाठी जागा आहेत, केवळ कुस्तीसाठीच जागा नाही, महापौर केसरी स्पर्धाही बंद पडल्या याकडे लक्ष वेधताना गेल्या वर्षीपासून जिल्हा केसरी स्पर्धा सुरु करण्यात आल्या, महिलांची राज्य अजिंक्यपद स्पर्धा भरवली, छबू पहेलवान प्रतिष्ठानच्या वतीने दोन वर्षे प्रसिद्ध पहेलवानांची मैदाने भरवल्याचे त्यांनी सांगितले.
नगरचे मल्ल जत्रा-यात्रेतून बाहेर पडतील?
पडझड झालेल्या तालमी, प्रशिक्षण केंद्र आणि प्रशिक्षकांचा अभाव, कुस्तीच्या बदलत्या तंत्राचा वेध घेण्याकडे वस्तादांचे झालेले दुर्लक्ष, स्पर्धेसाठी मैदानाचा अभाव, युवकांना आकर्षित करण्याकडे जिल्हा तालीम संघाने केलेले दुर्लक्ष अशा विविध कारणांतून गुणवत्ता असूनही नगरच्या कुस्तीची व मल्लांची उडी जत्रा-यात्रांच्या आखाडय़ापलिकडे जायला तयार नाही. राज्य सरकारची प्रतिष्ठेची ‘स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरी
First published on: 10-01-2013 at 03:14 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nager malla will came out side from jatra yatra