विदर्भासह राज्यातील विविध प्रश्न मार्गी लागावे या उद्देशाने उपराजधानीत विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना गेल्या सात दिवसात सत्ता आणि विरोधी पक्षाच्या गोंधळामुळे दहा ते बारा वेळा विधानसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले आहे. सभागृहात विदर्भातील एकाही प्रश्नावर चर्चा झाली नाही. त्यामुळे उपराजधानीत होणारे अधिवेशन नेमके कोणासाठी आणि कशासाठी? असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहे.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला ९ डिसेंबरला प्रारंभ झाल्यानंतर पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहात शोकप्रस्ताव आणि दुसऱ्या दिवशी अभिनंदन प्रस्ताव मांडण्यात आल्यानंतर पहिला आठवडय़ात जादूटोणा विधेयक सोडले तर विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा झाली नाही. पहिल्या आठवडय़ातील पहिले दोन दिवस वाया गेल्यानंतर सभागृहात नियमित कामकाज सुरू होऊन विदर्भाच्या प्रश्नांवर चर्चा होऊन ते मार्गी लागतील अशी अपेक्षा असताना विदर्भाच्या एकाही प्रश्नावर चर्चा झाली नाही. विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि त्यांना मिळालेली मदत या विषयावरून विरोधी पक्षांनी सभागृहात चर्चेची मागणी केली असता त्यावरून गोंधळ झाला. पहिला आठवडय़ात विदर्भाच्या कुठल्याच मुद्दय़ावर चर्चा झाली नसल्यामुळे दुसऱ्या आठवडय़ात तरी कामकाज सुरळीत होईल, अशी अपेक्षा असताना पहिले दोन दिवस मंत्र्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपावरून गाजले. विरोधी पक्षाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या भ्रष्ट मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली, त्यामुळे सभागृह सोमवारी आणि मंगळवारी तहकूब करण्यात आले. गोंधळामुळे विदर्भाचे अनेक प्रश्न अजूनही मार्गी लागले नाहीत. परिषदेमध्ये अशीच परिस्थिती असली तरी लक्षवेधी आणि विविध प्रश्नांवर चर्चा झाली. एकीकडे विदर्भासह राज्यातील विविध प्रश्न प्रश्न मार्गी लागावे यासाठी सत्ता आणि विरोधकांनी चर्चा करून ते सोडवावे, अशी अपेक्षा असताना केवळ जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. विधिमंडळाचे कामकाज सायंकाळी सहा वाजेपर्यंत होणे अपेक्षित असते. परंतु गेल्या सात दिवसात विधानसभेचे काम दुपारी संपले आहे. हिवाळी अधिवेशन दोन आठवडय़ाचे असताना त्यात शोकप्रस्तावाचा दिवस सोडला तर पहिला आठवठा आणि दुसऱ्या आठवडय़ातील दोन दिवस सत्ता आणि विरोधी पक्षाच्या गोंधळामुळे वाया गेले. अधिवेशनाचा कालावधी २० डिसेंबपर्यंत निश्चित करण्यात आला असून केवळ तीन दिवस शिल्लक आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मंत्र्यांनी राजीनामे द्यावे, तोपर्यंत सभागृहातील कामकाज चालू देणार नाही, असा इशारा विरोधकांनी दिला आहे तर काँग्रेसचे नेते आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांनी एकनाथ खडसे यांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे दुसरा आठवडा गोंधळात जाण्याची चिन्हे आहेत. या गोंधळामुळे पुन्हा एकदा विदर्भाचे प्रश्न ‘जैसे थे’ राहणार का? अशी चर्चा नागरिकांमध्ये होऊ लागली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा