काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी येत्या २१ सप्टेंबरपासून नागपुरात येत असल्याने विदर्भात काँग्रेसच्या निवडणूक प्रचाराला औपचारिक सुरुवात होणार असल्याचे समजले जात आहे. त्यांच्या विदर्भ दौऱ्याची अद्याप अधिकृ घोषणा झालेली नाही. परंतु, काँग्रेस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विदर्भ आणि मराठवाडय़ातील काही जिल्ह्य़ांना राहुल गांधी भेट देणार असून काँग्रेसच्या निवडक पदाधिकाऱ्यांनी चर्चा करणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या पदाधिकाऱ्यांच्या यादीत आपल्यालाही स्थान मिळावे, यासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.
नागपुरातील कार्यक्रमांचे स्थळ निश्चित करण्यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी चाचपणी केली. यापैकी दोन स्थळांना पसंती देण्यात आली असून त्यापैकी एका स्थळाची निवड केली जाणार आहे. विदर्भात झालेली अतिवृष्टी आणि पुराच्या संकटामुळे राज्य सरकारने केंद्राकडे मदतीची याचना केली आहे. परंतु, हा दौरा संपूर्णपणे काँग्रेसची अंतर्गत संघटनबांधणी आणि निवडणूक रणनिती ठरविणारा राहील, असे समजते. राजकीय समीक्षकांनी सदर दौरा काँग्रेसच्या निवडणूक प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी असल्याचे भाकीत केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत तसेच दुर्गम भागात पोहोचतो आहे वा नाही, याचा आढावा राहुल गांधी घेणार आहेत. विदर्भातील ग्रामीण भागात या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याची चाचपणीही राहुल गांधी करणार आहेत. याची जबाबदारी काँग्रेसच्या काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात येणार असल्याचे समजते. सरकारी योजनांविषयी पसरवले जाणारे गैरसमज दूर करण्याचा राहुल गांधींचा प्रयत्न राहील. विशेषत: राष्ट्रीय भू- सुधार विधेयकाबद्दलचे गैरसमज दूर करून शेतकऱ्यांच्या मनातील अढी काढून टाकण्याचा सल्ला दिल्लीतील वर्तुळाने राहुल गांधी दिला असून त्यादृष्टीने विदर्भातील शेतकऱ्यांना आकर्षित करण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार असल्याचे समजते.
नागपूर शहरातील निवडक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनाच राहुल गांधी घेणार असलेल्या बैठकीत प्रवेश दिला जाणार असल्याचे एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले. यात गेल्या विधानसभा, लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांना बोलण्याची संधी दिली जाईल. राहुल गांधींच्या दौऱ्याची सूत्रे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस गणेश पाटील हाताळत आहेत. त्यांनी गेल्या आठवडय़ात नागपूरला गोपनीय दौरा करून चाचपणी केली. त्यांना शहर काँग्रेसचे अध्यक्ष जयप्रकाश गुप्ता, महापालिकेतील विरोधी पक्षनेते विकास ठाकरे साह्य़ करीत आहेत.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा