नागपूर शहर काँग्रेसतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सोशल मीडिया प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी महिला अध्यक्ष आभा पांडे यांना व्यासपीठावर आमंत्रित न केल्यामुळे प्रमुख नेत्यांच्याच उपस्थितीत महिला कार्यकर्त्यांचे मानपमान नाटय़ रंगले.
अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या जयपूर येथे झालेल्या बैठकीत देशभर सोशल मीडिया प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्याचे राहुल गांधी यांनी जाहीर केल्यावर देशभरात शिबिरे घेतली जात आहेत. नागपुरात आज डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात शिबीर आयोजित करण्यात आले होते. उद्घाटनाच्यावेळी व्यासपीठावर प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांच्यासह शहर अध्यक्ष जयप्रकाश गुप्ता, नाना गावंडे, प्रकाश लोणारे, जिया पटेल, विशाल मुत्तेमवार, कृष्णकुमार पांडे, रामगोविंद खोब्रागडे आणि समीर मेघे आदी प्रमुख स्थानिक नेत्यांना आमंत्रित करण्यात आले. सभागृहात बसलेल्या महिला शहर अध्यक्ष आभा पांडे यांना व्यासपीठावर आमंत्रित करण्यात न आल्यामुळे पांडे यांच्या समर्थकांनी गोंधळ सुरू केला. आभा पांडे यांना व्यासपीठावर बोलविण्यात आले नाही तर आम्ही सभागृहात थांबणार नाही, अशी भूमिका घेत अनेक महिला घोषणा देत बाहेर जात असताना शहर अध्यक्ष जयप्रकाश गुप्ता यांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. गुप्ता यांना न मानता त्यांनी घोषणा देणे सुरू केले. अखेर सचिन सावंत यांनी पुढाकार घेत त्यांनी सर्व महिलांना शांत केले आणि आभा पांडे यांना सन्मानपूर्वक व्यासपीठावर बोलविले. महापालिकेतील विरोधी पक्ष नेते विकास ठाकरे यांना व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आले होते. ते उद्घाटनाच्या  वेळी सभागृहात उपस्थित नव्हते. सकाळी १० वाजता शिबिराला प्रारंभ होणार होता, पण सभागृहात कार्यकर्त्यांची असलेली अल्प उपस्थिती बघता जवळपास दोन तास कार्यक्रमाला उशिरा सुरू झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा