१० हजार हेक्टरवरील निम्म्या पिकाचे नुकसान
ऑगस्टमध्ये नागपूर जिल्ह्य़ात अतिवृष्टी झाल्याने १० हजार १०७ हेक्टरवरील पिकांचे ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान, तर ६ हजार ४४ हेक्टरवरील पिकांचे ५० टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करून तातडीने अंतिम सव्‍‌र्हेक्षण करून अहवाल शासनाला पाठविण्याचे आदेश कृषी खात्याला दिले असल्याचे पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
५ व ६ सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टीमुळे भिवापूर तालुक्यातील ५ हजार हेक्टरवरील सुमारे ६८.८६ लाख रुपयांच्या पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. उमरेड तालुक्यातील ३२ गावांमध्ये ४ हजार ३७८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्यापैकी १ हजार ३९६ हेक्टर क्षेत्रात ५० टक्क्यांच्या आत, तर २ हजार ९८२ हेक्टरमध्ये ५० टक्क्यांवर पिकांचे नुकसान झाले. भिवापूर तालुक्यातील ११० गावांमध्ये ११ हजार ७७३ हेक्टर क्षेत्रात पिकांचे नुकसान झाले. त्यापैकी ४ हजार ६४८ हेक्टरमध्ये ५० टक्क्यांच्या आत, तर ७ हजार १२५ हेक्टर क्षेत्रात ५० टक्क्यांवर पिकांचे नुकसान झाले. कामठी, काटोल, मौदा, पारशिवनी व इतरही तालुक्यात प्राथमिक अंदाजानुसार ५ हजार हेक्टर क्षेत्रात पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. नागपूर जिल्ह्य़ातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याच्या दृष्टीने अंतिम सव्‍‌र्हेक्षण करून अहवाल शासनाला पाठविण्याचे आदेश कृषी खात्याला देण्यात आले आहेत.
नागपूर जिल्ह्य़ात सर्वसाधारण क्षेत्र ५.९३ लाख हेक्टर असून खरीप पिकाखालील क्षेत्र ४.६६ लाख हेक्टर आहे. २०१२-१३ खरीप हंगामात ५ लाख ७ हजार हेक्टरवर पेरणी झाली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत कपाशीचा पेरा ११ टक्क्याने वाढला.
सोयाबीन १० टक्के व भात पिकाच्या क्षेत्रात ५ टक्क्याने घट झाली आहे. सध्या पीकस्थिती समाधानकारक असली तरी सोयाबीनच्या उताऱ्यात २५ टक्के घट होण्याची शक्यता आहे.
अतिवृष्टीमुळे नदी-नाल्याकाठावरील सोयाबीन पिकाचे चिखलाने नुकसान व काही प्रमाणात अळीचा प्रादूर्भावाने उत्पादनात १२ टक्के घट होण्याची शक्यता आहे. सततच्या पावसामुळे खोलगट व पाणी धरून ठेवणाऱ्या जमिनीतील पिकांची वाढ खुंटलेली दिसून येते.     

धरणे तुडुंब
यंदाच्या पावसामुळे जिल्ह्य़ातील धरणे तुडुंब भरली आहेत. १० सप्टेंबरला सकाळी १० वाजता तोतलाडोहमधील पाण्याची पातळी ४८९.७५० मिटर, तर पाण्याचा साठा १०२७.४२४ दलघमि होता. तो ९८.२७ टक्के भरलेला आहे. सध्या दहा दारे ०.३ मिटरने उघडली असून ३१६.८३ घ.मि.प्र.से. विसर्ग सुरू आहे. पेंच खैरीमधील पाण्याची पातळी ३२४.८९ मिटर होती. तो ९८.६० टक्के भरलेला असून सध्या आठ दारे ०.३ मिटरने, तर दोन दरे ०.५ मिटरने उघडली असून ३६०.७२ घ.मि.प्र.से. विसर्ग सुरू आहे. नांदमध्ये पाण्याची पातळी ३२४.८९ मिटर, तर पाण्याचा साठा ४२.१८ दलघमि होता. तो ८०.७२ टक्के भरलेला असून सध्या सर्व दारे बंद आहेत. वडगावमधील पाण्याची पातळी २५४.९७ मिटर होती. तो ९५.०२ टक्के भरलेला आहे. सध्या तीन दारे २३ सें.मी. उघडली असून ७२.१७७ घ.मी.प्र.से. विसर्ग सुरू आहे. सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना तसेच शेतीचे नुकसान होऊ नये म्हणून योग्य त्या प्रमाणात प्रकल्पातून पाणी  सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Story img Loader