नागपूर विभागीय मंडळातंर्गत सहा जिल्ह्य़ात दहावीच्या परीक्षेत मराठीच्या पेपरला ८३ कॉपीबहाद्दर पकडले जातात, मात्र इंग्रजीसारख्या अवघड पेपरला अवघे ३५ विद्यार्थी कॉपी करताना मोहिमेतील भरारी आणि बैठय़ा पथकाला सापडले. परीक्षार्थीमधील झालेला अचानक बदल आहे की कॉपीबाबत केलेली जनजागृती खरी आहे वा शिक्षण मंडळाने व जिल्हा प्रशासनाने बदनामी होऊ नये म्हणून राबविलेला छुपा अजेंडा आहे, याबाबत आता उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. दहावी आणि बारावी परीक्षेत आतापर्यंत कॉपी करणाऱ्या एकूण ३५९ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
दहावीच्या परीक्षेला २ मार्चला प्रारंभ झाल्यानंतर पहिल्याच दिवशी मायबोली मराठीच्या पेपरला ८३ आणि दोन दिवसांनी घेण्यात आलेल्या इंग्रजीच्या पेपरला ३५ विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडण्यात आले. दरवर्षी बारावी किंवा दहावीच्या इंग्रजी पेपरला सर्वाधिक कॉपी बहाद्दर पकडण्यात येतात अशा आतापर्यंत परीक्षांचा इतिहास आहे यावर्षी बारावीच्या परीक्षेत इंग्रजी पेपरला ४० विद्यार्थी तर दहावीच्या परीक्षेत ३५ विद्यार्थी पकडण्यात आले आहेत. त्यात सर्वात जास्त कॉपीबहाद्दर विद्यार्थी गोंदिया आणि चंद्रपूर आणि त्यापाठोपाठ नागपूर जिल्ह्य़ाचा समावेश आहे. गेल्या काही वर्षांत विदर्भातील कॉपीचे प्रमाण बघता टक्केवारीने विदर्भ दरवर्षी कॉपीमध्ये आघाडीवर असतो आणि निकालामध्ये टक्केवारीने सहाव्या सातव्या क्रमांकावर असतो. विशेषत दरवर्षी गोंदियाचा निकाल हा सर्वात जास्त असतो आणि त्याच ठिकाणी कॉपीचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात असल्यामुळे आता शिक्षण वर्तुळात गोंदिया जिल्ह्य़ाबाबत शंका उपस्थित केली जात आहे.
शिक्षण मंडळाने दहाबी आणि बारावीच्या परीक्षेच्या केलेली जनजागृती आणि मुख्यध्यापक व शिक्षकांच्या आयोजित केलेल्या कार्यशाळेमुळे कॉपीबाबतच बरीच जागृती झाल्याचा दावा मंडळाने केला आहे. गेल्यावर्षीचा अनुभव बघता मंडळाने यावर्षी भरारी पथकाची संख्या वाढविली. यावेळी बारावीच्या परीक्षेत ६० तर दहावीच्या परीक्षेत ४८ संवेदनशील केंद्र घोषित करण्यात आली होती. मात्र, यातील बहुतांश केंद्रावरच कॉपीचे प्रकार आढळल्याची माहिती मिळाली. काही संवेदनशील केंद्रावर मंडळाचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी यांच्या पथकाने दौरा केला. मंडळाच्या अधिकृत आकडेवारीनुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षेत आतापर्यंत २५८ कॉपीबहाद्दर पकडल्याचा दावा करण्यात आला असला तरी प्रत्यक्षात ग्रामीण आणि शहरी भागातील कॉपीबहाद्दर विद्यार्थ्यांची संख्या ५०० च्यावर असल्याची चर्चा आहे.
मंडळाचे अध्यक्ष चंद्रमणी बोरकर यांनी केलेल्या दाव्यानुसार यावर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षेत कॉपीचे प्रमाण बऱ्याच अंशी कमी झाले आहे. विशषेत दहावीच्या परीक्षेत कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आहे.
यावेळी भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्य़ात सर्वात जास्त कॉपीबहाद्दर विद्यार्थ्यांना पकडण्यात आल्याची माहिती मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. बारावीची परीक्षा अखेरच्या टप्प्यात असून दहावीचे चार ते पाच पेपर राहिले आहे त्यामुळे यावेळी कॉपीच्या प्रकरणे कमी राहतील, अशी शक्यता बोरकर यांनी वर्तविली. कॉपी प्रतिबंधासाठी विभागीय आयुक्तांचे एक पथक, जिल्हाधिकाऱ्यांचे जिल्हानिहाय ६ पथक, राज्य विज्ञान संस्था, शिक्षण उपसंचालक, सहाय्यक शिक्षण उपसंचालक, विभागीय व्यवसाय मार्गदर्शन अधिकारी, माध्यमिक, प्राथमिक व निरंतर शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी यांची १८ पथके, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक यांचे जिल्हा पातळीवरील सहा पथके, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, अधिव्याख्याता, विशेष महिला भरारी पथक व विभागीय मंडळ सदस्यांची १३ पथक कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी आणि परीक्षावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
कॉपीवर नियंत्रण की छुपा अजेंडा?
नागपूर विभागीय मंडळातंर्गत सहा जिल्ह्य़ात दहावीच्या परीक्षेत मराठीच्या पेपरला ८३ कॉपीबहाद्दर पकडले जातात, मात्र इंग्रजीसारख्या अवघड पेपरला अवघे ३५ विद्यार्थी कॉपी करताना मोहिमेतील भरारी आणि बैठय़ा पथकाला सापडले.
First published on: 12-03-2013 at 04:54 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur division recorded only 35 copying cases in ssc exams for english paper is it due to copy control action or hidden agenda