नागपूर जिल्ह्य़ातील पाणीटंचाईला सामोरे जाण्यासाठी आतापासूनच संबंधित अधिकाऱ्यांनी सतर्क राहणे आवश्यक असल्याचे पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात पाणीटंचाईबाबत घेतलेल्या आढावा बैठकीत सांगितले. टँकरने पाणीपुरवठा केल्यामुळे त्याचा अतिरिक्त आर्थिक बोजा शासनावर पडत असल्याने संपूर्ण जिल्हा टँकरमुक्त करावा, असे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिले.
पाणीटंचाईच्या काळात मोठय़ा प्रमाणात पाण्याचे टँकर पुरवण्यात येतात. याचा आर्थिक बोजा शासनावर पडतो. यातून मुक्त होण्यासाठी पाणीटंचाईच्या इतर पूरक योजनांकडे लक्ष द्यावे, असे पालकमंत्री मोघे यांनी बैठकीत स्पष्ट केले. गेल्यावर्षी जून ते ऑक्टोबर या कालावधीत प्रत्यक्षात १००९.१६ मि.मी. पाऊस झाला. जिल्ह्य़ातील पावसाची स्थिती समाधानकारक असून उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाई निवारणासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. ६०४ गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता असून त्यासाठी १ हजार ७२ प्रस्तावित उपाययोजना आखण्याात आल्या आहेत. ५ कोटी ६६ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून कुही व कामठी तालुक्यात ११ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे, अशी माहिती बैठकीत जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी पालकमंत्र्यांना दिली. गोरेवाडा भागात नवीन पाण्याची टाकी बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून देणे, रामटेकमध्ये पाणी वितरण व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न करणे, सूर, सांड व कोलार नदीत पेंच प्रकल्पाचे पाणी सोडण्याबाबत आमदारांनी यावेळी सूचना केल्या.  या बैठकीला जलसंधारण व रोहयो मंत्री डॉ. नितीन राऊत, अर्थ राज्यमंत्री राजेंद्र मुळक, आमदार सुधाकरराव देशमुख, चंद्रशेखर बावनकुळे, दीनानाथ पडोळे, आशीष जयस्वाल, नागो गाणार, सुधीर पारवे, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गोतमारे, जिल्हाधिकारी सौरभ राव उपस्थित होते.   

Story img Loader