गेल्या पाच सहा दिवसापासून विदर्भातील तापमानात काहीसा चढउतार सुरू असला तरी एकूणच वातावरणात निर्माण झालेली धग लक्षात घेऊन आरोग्य विभागाने तातडीने उपाययोजना करण्यास प्रारंभ केला असून त्या अंतर्गत प्रमुख शासकीय व महापालिका रुग्णालये तर जिल्ह्य़ात बहुतांश शासकीय रुग्णालयांमध्ये कुलर्सची सोय करण्यासोबतच उष्माघात कक्ष सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
गेल्या पाच दिवसापासून वादळी पावसामुळे विदर्भातील तापमान किंचित कमी झाले असले तरी उकाडा मात्र कायम आहे. विदर्भातील तापमानात चढउतार असून या बदलत्या वातावरणाचा तब्येतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्या पाश्र्वभूमीवर  मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अपूर्व पावडे यांनी नुकतीच बैठक घेऊन त्यात १ एप्रिलपासून मेडिकलच्या प्रत्येक विभागात कुलर्स लावण्याचे निर्देश दिले असून मेडिकलचा कोल्ड वॉर्ड सज्ज ठेवण्याच्या सूचना संबधितांना देऊन त्याचा आढावा घेण्यास सांगितले.
साधारणत उन्हाळा सुरू झाला की मेडिकल, मेयोमध्ये कुलर्स लावण्याचे काम सुरू केले जाते मात्र तो पर्यंत रुग्ण उकाडय़ात चांगलाच होरपळत असतो. ‘कोल्ड वॉर्ड’ सुद्धा एप्रिल किंवा मे महिन्यात तयार केला जातो. शासकीय निविदा निघाल्यानंतर प्रत्यक्षात वॉर्डामध्ये कुलर लावण्यासाठी वेळ लागतो. नादुरुस्त असलेले कुलर वेळेवर दुरस्ते केले जात नाही. त्यामुळे डॉ. पावडे यांनी बैठक घेऊन मार्चच्या पहिल्या आठवडय़ात तयारी सुरू केली असून अडगळीत ठेवण्यात आलेले कुलर बाहेर काढून त्याची दुरस्ती करण्याचे आदेश दिले. प्रत्येक विभागात किती कुलरची आवश्यकता आहे या संदर्भात प्रत्येक विभागाकडून माहिती मागिविण्यात आली असून प्रत्येक वॉर्डात किमान दोन कुलर्सची व्यवस्था करण्यात येणार आहे. पुढील आठवडय़ात महाविद्यालयामध्ये लावण्यात येणाऱ्या कुलरच्या बाबतीत आढावा घेण्यात येईल. या शिवाय स्वतंत्र ‘कोल्ड वॉर्ड’च्या व्यवस्थेसंदर्भात आढावा घेऊन त्या ठिकाणी औषधी, सलाईन व इतर सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे डॉ. पावडे यांनी सांगितले.  
दरम्यान आरोग्य विभागाने वाढत्या तापमानाच्या पाश्र्वभूमीवर, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, महापालिका आरोग्याधिकाऱ्यांना उष्माघात व त्याबद्दलच्या उपाययोजनांबाबत तयारी करण्याच्या दृष्टीने आदेश दिले आहेत. शासकीय रुग्णालयात आरोग्य विभागाने स्वतंत्र उष्माघात कक्षाची स्थापना केली आहे. महापालिकेने आपल्या रुग्णालयात हा कक्ष स्थापन करावा असे सूचित करण्यात आले.

Story img Loader