नागपुरात ऑटोमोटिव्ह चौक ते मिहान व प्रजापतीनगर ते लोकमान्यनगर असे दोन मेट्रो रेल्वे मार्ग प्रस्तावित करण्यात आले असून यासंबंधी सखोल प्रकल्प अहवाल (डीपीआर) सोमवारी दिल्ली मेट्रो रेल्वे कार्पोरेशनने नागपूर सुधार प्रन्सासला सोपविला. सध्या एकूण ९ हजार ७ कोटी रुपये खर्च (कंप्लिशन कॉस्ट) अपेक्षित असल्याची तसेच आजच मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी अहवाल पाठविला जाणार असल्याची माहिती पालकमंत्री शिवाजीराव मोघे, वित्तराज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी पत्रकार परिषदेत दिली. नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती प्रवीण दराडे, दिल्ली मेट्रो रेल्वे कार्पोरेशनचे महाव्यवस्थापक अरुणकुमारसिंह तसेच कार्यकारी अभियंता सुदर्शनकुमार याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते.
नागपूरला २०११ मध्ये झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात नागपूर सुधार प्रन्यासला मेट्रो रेल्वेसाठी नोडल एजंसी नियुक्त करण्यात आले होते. २९ नोव्हेंबर २०१२ तसा अध्यादेशही निघाला. नासुप्रने दिल्ली मेट्रो रेल्वे कार्पोरेशनला सखोल प्रकल्प अहवाल तयार करण्यास २२ फेब्रुवारी २०१२ रोजी नियुक्त केले. खासदार विलास मुत्तेमवार, अजय संचेती व अविनाश पांडे, पालकमंत्री शिवाजीराव मोघे, वित्तराज्यमंत्री राजेंद्र मुळक, उपहापौर संदीप जाधव, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती प्रवीण दराडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा प्रकल्प अहवाल सादर करण्यात आला. हा अहवाल आजच महाराष्ट्र शासनाला पठविला जाईल. महिनाभरात तो मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवला जाईल. त्यानंतर तो नगरविकास मंत्रालय, नियोजन आयोग तसेच अर्थमंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठविला जाईल. या प्रकल्पाच्या ५० मीटर क्षेत्रात कुठलेही बांधकाम करण्यापूर्वी ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. हा अहवाल केंद्र शासनाकडे पाठविला जाईल. तेथील विविध मंत्रालयांकडून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात होईल.
कामास सुरुवात झाल्यानंतर पाच वर्षांत तो पूर्ण करावयाचा आहे. एकाच वेळेस दोन्ही मार्गाचे ५-६ किलोमीटर काम एकाचवेळी सुरू केले जाईल. फक्त विमानतळ परिसरात ३.३ किलोमीटर अंतर मार्ग भुयारी राहणार आहे. भुयारी रेल्वे मार्ग तयार करण्यासाठी अडीचपट खर्च येतो. मिहान परिसरात मेट्रोचे आगार राहणार आहे. सुमारे दहा मीटर उंचीवर दुहेरी मेट्रो मार्ग राहील. गरज भासेल तेथे उंची वाढविण्यात येईल. रस्त्याच्या मध्यभागी स्तंभ उभारले जातील. प्रति किलोमीटर २२६ कोटी रुपये खर्च येईल. शहरातील वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी मेट्रो असून कमीत कमी जमीन लागेल.
इमारतींची कमीत कमी तोडफोड होईल, या दृष्टीने मार्ग आखण्यात आला आहे. मुख्यमंत्री तसेच इतर मंत्री या प्रकल्पासाठी इच्छुक असल्याने त्यात अडचणी येणार नाहीत. मंजुरी वेळेत मिळेल. २०१६ मध्ये सुमारे एक लाख लोक मेट्रोने प्रवास करतील, अशी अपेक्षा असल्याचे मोघे म्हणाले.
ऑटोमोटिव्ह चौक ते मिहान या २१.६०४ किलोमीटर मेट्रो मार्गाला सर्व करांसह ४०६३ कोटी रुपये तसेच प्रजापतीनगर ते लोकमान्यनगर या १८.२०६ किलोमीटर मेट्रो मार्गाला सर्व करांसह ३२८७ कोटी रुपये तर दोन्ही मार्ग मिळून विविध करांसह सध्या एकूण ९ हजार ७ कोटी रुपये खर्च (कंप्लिशन कॉस्ट) अपेक्षित आहे. केंद्र शासन, महाराष्ट्र शासन प्रत्येकी वीस टक्के निधी देईल.
शिल्लक निधी जपानच्या जेआयसीए कंपनीकडून कर्जरुपाने घेतला जाईल, असे वित्तराज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी सांगितले.
नागपूरकरांच्या मेट्रो रेल्वेच्या स्वप्नांना गती
नागपुरात ऑटोमोटिव्ह चौक ते मिहान व प्रजापतीनगर ते लोकमान्यनगर असे दोन मेट्रो रेल्वे मार्ग प्रस्तावित करण्यात आले असून यासंबंधी सखोल प्रकल्प अहवाल (डीपीआर) सोमवारी दिल्ली मेट्रो रेल्वे कार्पोरेशनने नागपूर सुधार प्रन्सासला सोपविला.
First published on: 19-02-2013 at 04:21 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur metro rail dream come true