डासांचा सुळसुळाट, तुंबलेल्या नाल्या, बंद पथदिवे, रस्त्यावरील खड्डे, काही भागात पाण्याचा अपुरा पुरवठा या व इतर नागरी समस्यांनी शहरात सध्या शिखर गाठले असून नागरिक त्रस्त झाले आहेत. तीन दिवसांच्या पावसानंतर शहरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. नागरिकांना भेडसावणाऱ्या या समस्या सोडविण्यासाठी महापालिकेचे कुठलेही प्रयत्न होताना दिसत नसल्याने नागरिकांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे.
महापालिकेच्या दुर्लक्षामुळे सध्या शहरात नागरी समस्या मोठय़ा प्रमाणावर वाढल्या आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. स्वच्छता पाळण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. मात्र, तीन दिवसांपूर्वी संततधार पावसामुळे शहरातील विविध घाणीचे साम्राज्य दिसून येते. पाऊस थांबला असला तरी  अनेक ठिकाणी  तुंबलेल्या नाल्या, बहुतेक भागातील रस्त्यांवरील खड्डय़ात साचलेले पाणी तसेच पावसामुळे सखल भागात निर्माण झालेली पाण्याची डबकी यामुळे शहरातील झोपडपट्टी भागासह काही सुशिक्षित वस्त्यामध्ये डासांचा सुळसुळाट झाला आहे. आबालवृद्ध साथीच्या रोगांनी त्रस्त आहेत. मात्र, तरीदेखील महापालिकेने अद्यापपर्यंत फॉगिंग मशीनने शहरातील अनेक भागात डासनाशक औषधांची फवारणी केलेली नाही. परिणामी डासांच्या व रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे. डासांसोबतच शहरातील काही भागात बंद असलेले पथदिवे ही एक प्रमुख समस्या गेल्या अनेक महिन्यांपासून आहे. शहराबाहेरील महार्गावर आणि चौक हायमास्ट दिव्यांनी झळकावणाऱ्या महापालिकेला शहरातील लेआऊट आणि काही नगरातील नेहमी बंद असलेले पथदिवे बदलण्याची आवश्यकता वाटत नाही. पथदिवे बंद असल्याने अनेक भागात रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य असते. महापालिकेने यापूर्वी विद्युत विभागाचा आढावा घेऊन शहरातील रस्त्यावरील दिवे सुरू करण्यात यावे, असे निर्देश दिले होते. त्यावर कुठलीच कारवाई झाली नाही. अनेक भागात रात्री अंधाराचे साम्राज्य असल्यामुळे उपघाताचे प्रमाण वाढले आहे. अनेक वेळा मागणी करूनही बंद दिवे बदलण्यात येत नाहीत, हे विशेष.
रस्त्यावरील खड्डे ही समस्या सध्या अनेकांना डोकेदुखी ठरली आहे. शहरातील सिमेंट रोड सोडले तर डांबरीकरण असलेल्या मार्गावर खड्डय़ाचे साम्राज्य असल्यामुळे चांगला रस्ता शोधावा लागतो. गेल्या दोन तीन वर्षांत शहरातील विविध भागात डांबरीरोड करण्यात आल. त्यातील अनेक रस्त्याचा दर्जा चांगला नाही. आता तर त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. जुन्यासह नव्या रस्त्यांचा दर्जा निकृष्ट असल्याने रस्त्यावर खड्डे की खड्डय़ात रस्ता हेच समजत नाही. ऑरेंज सिटी वॉटर वर्क्‍सने शहरातील विविध रस्ते खोदून ठेवले आहेत त्यामुळे नागरिकांना असह्य़ त्रास सहन करावा लागत आहे.

भर पावसाळ्यात शहरातील मध्य नागपूर आणि पूर्व नागपुरातील  काही भागात अपुरा पाणी पुरवठा ही नागरिकांना भेडसावणारी आणखी एक समस्या आहे. विदर्भात काही भागात झालेल्या दमदार पावसाने लघु व मध्यम प्रकल्प पाण्याने भरत आहेत. एकंदरीत, पावसाने पाणीप्रश्न एकदाचा सोडवला आहे. मात्र महापालिका आणि ग्रामीण भागात काही ठिकाणी पाणीपुरवठा नियमित केला जात नाही. शहरातील समस्या बघता महापालिकेने अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना कामाला लावले असले तरी असताना प्रशासन, नगरसेवक, विरोधी पक्ष या नागरी समस्या सोडविण्यासाठी कुठल्याही हालचाली करताना दिसत नाहीत त्यामुळे प्रत्येक नागरिक आता आम्ही कोणाकडे जावे? असा प्रश्न उपस्थित करीत आहे.

Story img Loader