सलग तीन दिवसांपासून शहरात पावसाची रिपरिप सुरू असल्यामुळे खोलगट भागात पावसाचे पाणी साचले आहे. सर्वत्र पसरलेले घाणीचे साम्राज्य, दूषित पाणी आणि वातावरणातील बदलानेही साथीच्या रोगांचा झपाटय़ाने प्रसार होऊ लागला असून ताज्या आकडेवारीनुसार सरकारी रुग्णालयातील बाह्य़ रुग्ण विभागात किमान ६००वर रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. खासगी दवाखान्यांमधील रुग्णांची संख्याही सतत वाढत आहे.  
न्यूमोनिया, डायरिया, मलेरिया पीडितांची संख्या खासगी रुग्णालयात याची संख्या भरपूर आहे. नागपुरात सर्दी, खोकला, डोळे येणे, उलटय़ा अशा आजारांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहेत. मेंदूज्वर, मलेरिया, चंडीपुरा, चिकनगुनिया त्याचप्रमाण हगवण, कावीळ असे कितीतरी प्रकारचे आजारही वाढले आहेत. त्यामुळे नेमके निदान करणे डॉक्टरांना कठीण झाले आहे. आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक दवाखान्यातही रुग्णांची भरपूर गर्दी दिसून येते. विशेषत: लहान मुलांची संख्या जास्त आहे. शासकीय रुग्णालये, खाजगी रुग्णालये, पालिकेची रुग्णालयांत रुग्णांच्या रांगा सकाळपासून लागलेल्या असतात. सकाळी पाऊस तर दिवसभर ढगाळी वातावरण आणि सायंकाळी थंडी असे वातावरण आहे. या वातावरणाशी जुळवून घेणे लहान मुलांना शक्य नाही. शून्य ते ८ वर्षे वयोगटातील मुले वातावरणातील या बदलामुळे आजारी पडत आहे. सॅण्डफ्लाय (माशी), एडिस इजिप्टाय, क्यूलेस, अ‍ॅनाफेलिस या डासांमुळे ताप येतो, असा इशारा डॉक्टरांनी दिला असून जवळपास घाणीचे साम्राज्य असेल तर पाणी उकळून पिण्याची आणि शक्यतो मच्छरदाणीत झोपण्याची काळजी घेण्याच्या सूचना डॉक्टरांनी केल्या आहेत. जलजन्य आजारांचे वाढते प्रमाण पाहता काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. शहरातील भेळपुरी व पाणीपुरी विक्रेत्यांना महापालिकेतर्फे प्रशिक्षण दिले जाणार असून त्याची जबाबदारी प्रत्येक झोन अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.  परिसर स्वच्छ ठेवणे, भांडी स्वच्छ ठेवणे, खाद्य पदार्थ उघडे न ठेवता झाकून ठेवणे, पाणी स्वच्छ ठेवणे, क्लोरीन गोळीचा वापर, चर्मरोगापासून बचाव आदी अनेक बाबींचा त्यात समावेश आहे. या सर्वाना महापालिकेच्या रुग्णालयातून आरोग्य तपासणी करावी लागणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा