पश्चिम महाराष्ट्र व पूर्व महाराष्ट्र, अशी विभागणी करून राज्य सरकार विकासाच्या बाबतीत पूर्व महाराष्ट्र अर्थात, विदर्भाला वर्षांनुवर्षे सापत्न वागणूक देत आहे. हेच सूत्र आता राज्याच्या परिवहन खात्यानेही अवलंबिले आहे. उपराजधानीतील प्रादेशिक परिवहन कार्यालयाने उपकार्यालय सुरू करून पूर्व नागपुरातील नागरिकांना सापत्न वागणूक दिल्याचे स्पष्ट झाले आहे. एकच जिल्हा, एकच तालुका आणि एकच शहर असूनही पूर्व नागपुरातील नागरिकांना वाहनचालक परवाना नूतनीकरणासाठी ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) काढावे लागत असून यासाठी त्यांना आर्थिक भरुदड सहन करावा लागत आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालयात १६ ऑगस्ट २०१२ ला पूर्व नागपूरसाठी नवीन कार्यालय म्हणून उपप्रादेशिक कार्यालय सुरू करण्यात आले. या कार्यालयात ४४०००२, ३, ४, ८, ९, ४४००१४, १५, १७, १८, २४, २६, २७, ३२, ३५ या पीन कोडअंतर्गत अयाचित मंदिर, बडकस चौक, गांधीबाग, महाल, मस्कासाथ, अजनी, बेझनबाग, कडबी चौक, बगडगंज, लकडगंज, वर्धमाननगर, हनुमाननगर, नंदनवन, रेशीमबाग, सक्करदरा, जरिपटका, नरेद्रनगर, बाबा बुधाजीनगर, कमाल टॉकीज, टेका नाका, सेन्ट्रल एव्हेन्यू, डागा हॉस्पिटल, महात्मा फुले मार्केट, रेल्वे स्टेशन, संत्रा मार्केट, मोमीनपुरा, सुभाष रोड, अयोध्यानगर, उप्पलवाडी, भगवाननगर, म्हाळगीनगर, कळमना मार्केट आदी वस्तींचा समावेश आहे. या वस्तीतील नागरिकांना वाहनचालक परवाना नूतनीकरणासाठी ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) काढावे लागते. यासाठी त्यांना २० रुपये शुल्क भरावे लागते. संगणकीकृत असलेल्या वाहन चालक परवाना (स्मार्ट कार्ड) तसेच हाताने लिहिलेली (मॅन्युअल) असलेल्या परवानाधारकांनाही २० रुपये शुल्क भरून ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करावे लागते. एकच कार्यालय असून प्रादेशिक कार्यालयातून (एमएच ३१) उपप्रादेशिक कार्यालयात (एमएच ४९) नावे व पत्ता आणण्यासाठी २० रुपये जास्तीचे घेणे हे पूर्व नागपुरातील नागरिकांवर अन्याय होत नाही का?, असाही प्रश्न नूतनीकरण करण्यासाठी गेलेल्या नागरिकांना पडतो. तसेच ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी त्याला तीन ते पाच दिवसांचा कालावधी लागतो. त्यानंतरच नूतनीकरणाचा अर्ज सादर करता येतो. नागरिकांना या एकाच कामासाठी दोनदा कार्यालयात जावे लागते. एकाच शहरात राहणाऱ्या नागरिकांसाठी दोन कार्यालये सुरू करणे, ही बाब सोईच्या दृष्टीने योग्य वाटत असली तरी त्याच कामासाठी काही नागरिकांना आर्थिक भरुदड पडणे उचित नाही, अशीच वाहनधारकांची तीव्र प्रतिक्रिया आहे.
पूर्व नागपुरात अर्धे शहर
पूर्व नागपूरच्या उपप्रादेशिक कार्यालयात उपराजधानीचे अर्धे अधिक शहर येत असल्याचे जाणवते. त्यात उत्तर नागपूर, दक्षिण-पश्चिमचा काही भाग, मध्य नागपूर आणि पूर्व नागपूरचा समावेश आहे.
रवींद्र भुयार यांचे आवाहन
प्रादेशिक कार्यालयातून (एमएच ३१) नाव व पत्त्याची कागदपत्रे उपप्रादेशिक कार्यालयाला (एमएच ४९) हस्तांतरित करण्यासाठी शासनाने २० रुपये नियमाप्रमाणे आकारले जातात. पूर्व नागपुरातील वाहनधारकांनी व परवानाधारकांनी प्रादेशिक कार्यालय (एमएच ३१) मधून उपप्रादेशिक (एमएच ४९) कार्यालयात नाव, पत्ता व रजिस्ट्रेशन बदलविण्याचे असेल त्यांनी उपप्रादेशिक कार्यालयाच्या  mh49drtonagour@gmail.com या जी-मेलवर किंवा साध्या अर्जावर वाहनचालक परवाना नंबर, नाव, पत्ता पाठवून सहजरीत्या आपले काम करावे, असे आवाहन पूर्व नागपूरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur news
Show comments