नव्या आर्थिक वर्षांत आकारण्यात येणाऱ्या चार नव्या करांचा प्रस्ताव विरोधी पक्षांनी केलेल्या आंदोलनामुळे स्थगित ठेवण्यात आल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.  विविध करांमध्ये बदल करण्यासंदर्भात प्रस्ताव प्रशासनाने तयार केला. तो सभागृहासमोर मंजुरीसाठी ठेवण्यात येणार होता. त्यामुळे नागरिकांवर मोठा भुदर्ंड बसण्याची शक्यता असताना विरोधी पक्षांच्या दणक्यामुळे सोमवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये या विषयावर चर्चा न करता तो स्थगित ठेवण्यात आला.
महाराष्ट्र महापालिका कायद्याप्रमाणे (एनएमसी) दर वर्षांच्या फेब्रुवारी महिन्यात पुढील आर्थिक वर्षांत नागपूर शहरात कशा पद्धतीने कर लावण्यात येणार आहेत, याचा प्रस्ताव तयार करण्याची तरतूद या कायद्यामध्ये आहे. त्याप्रमाणे कर समितीने नव्याने कर आकारण्याबाबत नियमावली व बदलेले विविध दर याबाबत प्रस्ताव तयार केला होता. सामान्य करामध्ये १८ ते ३४ टक्के वाढ करण्यात येणार आहे. सर्व वार्षिक कर मूल्यांवर आधारित आहेत. यापूर्वी मलजल लाभ कर, पाणी लाभ कर, रस्ते आणि महापालिका शिक्षण कर घेतला जात नव्हता. मात्र, नव्या कायद्यानुसार हे तीनही कर आता नागरिकांकडून आकारले जाणार होते. मलजल लाभ कर ५ टक्के, पाणी लाभ कर ५ टक्के, रस्ते कर ५ टक्के आणि महापालिका शिक्षण कर १ टक्का वाढ सूचविण्यात आली होती, त्यामुळे नागरिकांवर किमान १८ ते २० टक्के करवाढ होणार असल्यामुळे मोठा भुदर्ंड बसणार होता.
काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षाने महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या आधी या वाढीव कराला विरोध करण्यासाठी प्रवेशद्वाराजवळ निदर्शने केली. विरोधी पक्षनेते विकास ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते प्रकाश गजभिये, कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी अमृत मेश्राम, मनोहर मुळे यांनी निदर्शने केली. यावेळी सत्तापक्षाच्या विरोधात घोषणा देत विरोधकांनी सभागृहात प्रवेश केला. महापौर प्रवीण दटके सभागृहात आले असताना त्यांनाही विरोधकांनी घेराव करीत करवाढीचा प्रस्ताव रद्द करावा, अशी मागणी केली. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने या प्रस्तावित कराला विरोध करीत निदर्शने केली. विरोधकांच्या गोंधळामुळे सभागृहात करवाढीचा प्रस्ताव स्थगित ठेवण्यात आल्याने त्यावर चर्चा झाली नाही.
या संदर्भात विरोधी पक्षनेते विकास ठाकरे म्हणाले, नव्याने तीन कर लावण्यात येणार असल्यामुळे १८ ते २० टक्के करवाढ झाली असती आणि नागरिकांवर मोठा भुदर्ंड बसला असता. या प्रस्तावित करवाढीच्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी महापौरांना विनंती केली त्यामुळे हा विषय स्थगित ठेवला. तत्पूर्वी काँग्रेसतर्फे या करवाढीच्या विरोधात महापालिकेच्या प्रवेशाद्वारासमोर निदर्शने करण्यात आली. यापुढे सभागृहात जेव्हा कधी वाढीव कराचा प्रस्ताव येईल, त्याला पक्षाचा विरोध राहील. महापालिका अतिरिक्त कर लावून जनतेची एकप्रकारे पिळवणूक करीत आहे. अच्छे दिन आये है अशी घोषणा करणारे भाजप जनतेवर कर लादत असेल तर त्याला विरोध राहील. पाण्याची वाढीव देयके पाठविली जात असून नागरिकांना ती भरण्यास सक्ती केली जात आहे. कुठलीही शहनिशा न करता पाठवण्यात येणारी पाण्याच्या देयकाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ठाकरे यांनी केली.
या संदर्भात महापौर प्रवीण दटके म्हणाले, चार वाढीव कराबाबत भूमिका स्पष्ट करण्यासंदर्भात पुढच्या सभेत चर्चा करण्यात येईल. विरोधामुळे सभागृहात हा विषय आला नाही. विरोधकांना विश्वासात घेऊन आणि चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.  नागरिकांवर कुठलाही अतिरिक्त कराचा बोझा पडणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur news
Show comments