शहरातील जैवविविधतेचे पर्यटनाच्या दृष्टीने असलेले महत्त्व ओळखून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रवास व पर्यटन विभागाच्यावतीने पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना जैवविविधतेची ओळख व्हावी म्हणून नुकतेच गोरेवाडा जैवविविधता बगिचा येथे निसर्ग भ्रमंती आयोजित करण्यात आली.
या निसर्ग भ्रमंतीला विख्यात वनस्पतीतज्ज्ञ निशिकांत जाधव यांनी मार्गदर्शन केले. यात त्यांनी नागपूर परिसरात मुख्यत्त्वे घराच्या जवळपास व रानात आढळणाऱ्या वृक्षांव्यतिरिक्त भ्रमंतीदरम्यान आढळणारे येन, धावडा, बेहडा, त्रिफळासारख्या आयुर्वेदिक वनस्पतींची माहिती दिली. या वनस्पतींचे औषधीशास्त्रातील उपयोगाचे महत्त्व व आदिवासींद्वारे त्याचा उपयोग विशद केला. स्थानिक व स्थलांतरित पक्ष्यांचे नागपूर परिसरातील वास्तव्य व या वास्तव्याचा काळ, या पक्ष्यांचा उपक्रम, विशेष दिसणारे पक्षी, जंगलाकडून मानवी वस्तीकडे होणारे त्याचे स्थलांतर आदी विषयांचा जाधव यांनी मागोवा घेतला. मध्यभारतातील व नागपूर सभोवतालच्या जैवविविधता परिसर आणि तेथील प्राणी व पक्षी गणना यांची विस्ताराने चर्चा केली. प्रवास व पर्यटनाच्या दृष्टीने आयोजित निसर्ग भ्रमंती आयोजनाचा लाभ विद्यार्थ्यांनी घेतला. यावेळी विभागातील शिक्षक रुपींदर कौर नंदा, डॉ. अरविंद उपासनी, डॉ. ए.के. भट्टाचार्य यांनी विशेष परिश्रम घेतले. पर्यटनाच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या नागपूर परिसरताील गोरेवाडा जैवविविधता बगिचा येथील जैवविविधतेची नगरवासीयांना ओळख व्हावी व त्यांचे जतन व्हावे म्हणून अशा प्रकारचे उपक्रम राबविण्यात यावे, अशी मागणीही निसर्ग भ्रमंतीमध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी केली.