शाळांना सुट्टय़ा लागल्या, तशी शहरातील विविध भागातील महापालिका आणि नागपूर सुधार प्रन्यासची उद्याने गजबजू लागली असताना शहरातील काही भागातील उद्यानांची मोठय़ा प्रमाणावर दुर्दशा झाली असून त्यांच्या देखभालीकडे हवे तसे लक्ष दिले जात नाही, ही बाब महापालिका आणि नागपूर सुधार प्रन्यास यांनीच दिलेल्या माहितीच्या आधारे स्पष्ट होत आहे. ‘हिरवे नागपूर’ हे बिरुद मिरवण्याच्या नादात उद्यानांच्या महत्त्वाच्या बाबींकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
सुधार प्रन्यासची शहरात लहानमोठी मिळून ४९ उद्याने, तर महापालिकेची ७० पेक्षा अधिक उद्याने आहेत. या उद्यानांमधील पिण्याच्या पाण्याची सोय, पक्क्या बांधकामाची किंवा फायबरची प्रसाधनगृहे, सूचनाफलक, कारंजे, तक्रार रजिस्टर, देखभालीसाठी माळ्याचे निवासस्थान, जॉगिंग ट्रॅक, लहान मुलांसाठी झोपाळे, घसरगुंडी इत्यादी खेळणी यांची उपलब्धता आणि बाकांची संख्या आदी मुद्यांवर शहरात सर्वेक्षण करण्यात आले असता त्यात अनेक उद्यानांमध्ये अनियमितता दिसून आली. प्रन्यासच्या २५ उद्यानांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नाही. ३४ उद्यानांत प्रसाधनगृहे नसून २८ मध्ये सूचनाफलक नाहीत. ६ कारंजे चालू स्थितीत असून ७ बंद आहेत. अनेक महापालिकेच्या उद्यानात तक्रारीचे रजिस्टर किंवा सूचना पेटी नसून माळ्यांचे निवासस्थानही नाही. लहान मुलांसाठीच्या खेळण्यांपैकी अनेक खेळणे नादुरुस्त आहेत. उद्यानांमध्ये ५३७ पेक्षा अधिक बाके असून त्यातील बहुतांश बसण्यासाठी योग्य नसल्याचे दिसून येते. महापालिकेच्या ४७ उद्यानांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय असून ११ उद्यानांमध्ये ते मिळू शकत नाही. २९ उद्यानांमध्ये प्रसाधनगृहाची सोय नसून ८ उद्यानांच्या बाहेर ‘सुलभ शौचालय’ उपलब्ध आहेत. ३७ उद्यानांमध्ये सूचनाफलक नाहीत. ४१ कारंजे चालू स्थितीत असून ३० कारंजे बंद आहेत. महापालिकेच्या १४ उद्यानांमध्ये माळी किंवा चौकीदाराचे निवासस्थान आहे. २२ उद्यानांत चौकी असल्याचे महापालिकेचे म्हणणे असून इतर ठिकाणी ही सोय नाही. ज्या उद्यानांत खेळणी आहेत, तिथे अनेक ठिकाणी ती नादुरुस्त किंवा तुटलेली आहेत. हिरवाई हा उद्यानाच्या आकर्षकतेचा सगळ्यात प्रमुख मुद्दा आहे. मात्र, झाडांना पाणी देण्याच्या वेळा ठरलेल्या नसून वाढलेले गवत कापण्याचे काही निकष नाही, आवश्यकतेनुसार पाणी देण्यात येते व गवत कापण्यात येते. शहरातील काही मोकळ्या भूखंडांवर मनपाने लहान- लहान उद्यानेही तयार केली आहेत. त्याच्या देखरेखीकडेही मनपाचे दुर्लक्षच असते. या प्रत्येक उद्यानावर कर्मचारी नियुक्त केले आहेत. मात्र, ते नावालाच! ते काम करतात की नाही, मुळात ते उपस्थित असतात की नाही याचीही कधी माहिती घेतली जात नाही. कोणी तसा प्रयत्न केलाच, तर लगेच त्याला गप्प केले जाते. कारण असे बहुसंख्य कर्मचारी एखाद्या तरी बलदंड नगरसेवकाशी बांधले गेलेले आहेत. त्यांनीच त्यांना नोकरीत घेतलेले असल्याने ते मनपाचे वेतन घेत असले, तरी काम मात्र संबंधित नगरसेवकाचे वा पदाधिकाऱ्याचेच करत असतात. त्यांना शिस्त लावणे ही आता अधिकाऱ्यांच्या आवाक्याबाहेरची बाब झाली आहे. त्यातूनच मनपा आणि नासुप्रची ही लहान उद्याने म्हणजे ओसाड वाळवंटे झाली आहेत.
उद्यानांच्या सुधारणेचे मनपा-नासुप्रला वावडे!
शाळांना सुट्टय़ा लागल्या, तशी शहरातील विविध भागातील महापालिका आणि नागपूर सुधार प्रन्यासची उद्याने गजबजू लागली
First published on: 25-04-2014 at 07:49 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur news