आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जनआंदोलनाच्या इशाऱ्यानंतर जिल्हा प्रशासन वेळीच जागे झाल्याने अखेर दीड वर्षांपासून बंद असलेले कोराडी येथील नायब तहसीलदार यांच्या उपस्थितीत सेतू कार्यालय गुरुवारपासून सुरू झाले.
कामठी परिसरातील गावांसाठी आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी तारांकित प्रश्न, लक्षवेधी, अतारांकित प्रश्न, औचित्याचा मुद्दा आदी सनदशीर मार्गाने सातत्याने विधानसभेत प्रयत्न करून शासनास सेतू कार्यालय सुरू करण्यास भाग पाडले. या नायब तहसीलदार कार्यालयातून कोराडी परिसरातील महादुला, सुरादेवी, खापरी, तांदुळवाणी, गुमथी, लोणखैरी, खापा (पाटण) आदी पंधरा ते वीस गावातील नागरिकांना जातीचे दाखले, उत्पन्न प्रमाणपत्र, सात-बारा, शपथपत्र तसेच इतर शासकीय प्रमाणपत्रे या सेतू केंद्रातून मिळत होते. मात्र, गेल्या दीड वर्षांपूर्वी हे केंद्र बंद पडले. शासनाचा आदेश असूनही केवळ प्रशासनाने जाणीवपूर्वक हे केंद्र बंद पाडल्याचा आरोप आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला होता.
हे केंद्र बंद पडल्याने या परिसरातील नागरिकांना कामठीला जावे लागते. वेळेवर एसटी बस नसल्याने अनेकदा कामठीला जास्तीचे पैसे मोजून जावे लागते. त्यामुळे नागरिकांना नाहक आर्थिक भुदर्ंड सहन करावा लागतो. नागरिकांची समस्या लक्षात घेऊन हे नायब तहसीलदार कार्यालय व सेतू केंद्र दोन दिवसात सुरू करावे, अशी मागणी करीत ते सुरू न झाल्यास जनआंदोलनाचा इशारा त्यांनी दिला दोन दिवसांपूर्वी दिला होता. तसे निवेदनही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी या मागणीची दखल घेत कोराडीमधील हे सेतू कार्यालय सुरू केले. नायब तहसीलदार वर्पे यांची नियुक्ती तेथे करण्यात आली. स्टॅम्प व्हेंडर म्हणून वसंत काळे व इतर अर्जनवीस तेथे उपलब्ध राहतील.
हे कार्यालय सुरू झाल्यानंतर नायब तहसीलदार वर्पे यांची भारतीय जनता पक्षाच्या एका शिष्टमंडळाने भेट घेतली. कुठल्याही नागरिकाचेकाम अडणार नाही, असे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले. सोमवारलादेखील हे कार्यालय सुरू ठेवावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. महादुला नगर पंचायतीच्या अध्यक्ष कांचन कुथे, नगर उपाध्यक्ष राजेश रंगारी, कोराडीचे सरपंच चंद्रशेखर बिरखेडे, राजेश मछले, विलास तभाने,
संजय भोंगाडे, भाजपचे गट नेते रामबाबू तोडवाल यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Story img Loader