शब्द आणि दृश्यकलेच्या घटकातून एक उत्तम कला अविष्काराची निर्मिती म्हणजे ‘दस्तखत’ आहे. सेंट्रल इंडिया स्कूल ऑफ फाईन आर्टसच्यावतीने तीन कला प्रदर्शनाची मालिका सुरू झाली. त्यातला पहिला टप्पा सिस्फाच्या रंगरेषा विभागाचे विभाग प्रमुख प्रा. बाबर शरीफ यांच्या ‘दस्तखत’ या रंग रेषेच्या कलाकृतींचा आहे. सिस्फाच्या गॅलरीत या उपक्रमाची सुरुवात झाली.
प्रा. बाबर शरीफ यांनी पहिले प्रदर्शन हे त्यांचे वडील व या शतकाचे उर्दू कवी दिवं. शरीफ अहमद शरीफ यांच्या कलाविष्काराला समर्पित केले आहे. कवितेतून समग्र भाव रंगरेषेच्या प्रभावी अविष्काराने प्रा. बाबर यांनी दृश्यरूपात मांडले आहेत. प्रभावी शब्द आणि प्रभावी दृश्यघटक यांचा सुंदर संगम म्हणजे बाबर शरीफ यांचा ‘दस्तखत’ आहे. शब्दाला काळया रेषेची जोड आणि त्यातील लयीतून प्रकट झालेले ‘दस्तखत’ हा साहित्य आणि दृश्यकलेतील दुवा अतिशय उत्तमपणे साधला आहे. या प्रदर्शनात एकूण ४७ कलाकृती असून कॅनव्हासवरील ह्या कलाकृती अतिशय प्रभावी अभिव्यक्ती अशीच झाली आहेत.
या प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार शैलेश पांडे यांच्या हस्ते, लक्ष्मीनगरातील सिस्फाच्या गॅलरीत करण्यात आले. सिस्फाच्या कलाविष्कारातील सातत्याचे त्यांनी कौतुक केले. नवनवीन कलाकार व जुने मातब्बर कलाकार यांच्या विविध प्रदर्शनाची नागपूरकर रसिक आणि कलाकारांना श्रीमंत करण्याचे कार्य सिस्फाने केले आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
‘तुम्हारी कब्र पर मै फतेह पढने नही आया,
मुझे मालुम था तुम मर नही सकते,
तुम्हारे मौत की सच्ची खबर जिसने उडाई थी वो झुठा था,
तुम्हारी कब्र में मै दफन हूँ तुम मुझमे जिंदा हो,
कभी फुरसत मिले तो फतेहा पढने चले आना’
असे काव्यरूपात प्रा. बाबर यांनी त्यांच्या चित्रांचा गाभा समजावून सांगितला. हे प्रदर्शन प्रेक्षकांसाठी ११ जूनपर्यंत दररोज सायंकाळी ४ ते रात्री ८ या वेळात सुरू असणार आहे.

Story img Loader