विदर्भाचे सांस्कृतिक वैभव समजली जाणारी परंपरागत पद्धतीने तान्हा पोळ्याच्या म्हणजे उद्या, मंगळवारी सकाळी निघणाऱ्या मारबत आणि बडग्याच्या मिरवणुकीवर यंदा राज्यातील विविध भ्रष्ट मंत्र्यांच्या बडग्यांसह महागाई, रस्त्यांवरील खड्डे आणि इतरही समस्यांचा प्रभाव राहणार आहे. शिवाय, स्वदेशी बचाव विदेशी हटावो, प्रदूषण आणि रोगमुक्त नागपूर आदी विषयांवर बडगे तयार केले जात आहेत. त्याचप्रमाणे यंदाही काढण्यात येणारी काळी-पिवळी या ऐतिहासिक मारबती मिरवणुकीचे खास आकर्षण राहणार आहे.
समाजातील अनिष्ट प्रथांचे उच्चाटन करण्याच्या हेतूने तान्हा पोळ्याच्या दिवशी ही मिरवणूक निघणार असून त्यात ऐतिहासिक काळी व पिवळी मारबतीसह बडगे तयार केले जात आहेत. दरवर्षी महापालिका, भ्रष्टाचार, दहशतवाद, शहरातील समस्या आदी विषयांवर बडगे काढले जातात. मारबत आणि बडग्याच्या मिरवणुकीच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर यथार्थ टीका केली जाते. मस्कासाथेतील छत्रपती शिवाजी पार्क बडग्या उत्सव समिती दरवर्षी बडगा तयार करूत असून यावेळी सामाजिक संदेश देणारा बडगा तयार केला जात आहे. याशिवाय, दहशतवादी आणि महापालिकेत गाजत असलेल्या विविध समस्यांवरील बडगा मिरवणुकीत राहणार आहेत. शहरातील विविध भागात बडगे आणि मारबती तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. मस्कासाथ परिसरातील छत्रपती शिवाजी पार्क बडग्या उत्सव समितीचे पदाधिकारी मोरेश्वर वानखेडे म्हणाले, गेल्या ४० वर्षांंपासून विविध विषयांवर किंवा राजकीय नेत्यांचे बडगे तयार केले जातात. चीनचे भारतावर आक्रमण वाढत असताना ते रोखण्याची गरज आहे, हा संदेश देत चीनविरोधी बडगा तयार केला जाणार आहे. मासुरकर चौक, लालगंज, प्रेमनगर, फुकट नगर, पिवळीनदी, इतवारी, लालगंज, खैरीपुरा, नंदनवन झोपडपड्डी भागात बडग्या तयार केला जात आहे. मात्र, तुर्तास नाव घोषित करण्यात आले नसल्याचे कार्यकर्त्यांंनी सांगितले.
काळ्या मारबतीला १३४ वर्षांंचा, तर पिवळ्या मारबतीला १३० वर्षांंचा इतिहास असून दोन्ही मारबती एकाच वेळी निघतात. मारबत उत्सवाबद्दल बोलताना संस्थेचे सचिव विजय खोपडे म्हणाले, इंग्रजी राजवटीने जनता त्रस्त होती. सर्वत्र इंग्रजांचा अन्याय अत्याचार पसरला होता. परकीयांच्या गुलामगिरीचे पाश तुटावेत व भारत देश स्वतंत्र व्हावा, अशा देशभक्तीच्या भावनेने प्रेरित होऊन १८८५ मध्ये जागनाथ बुधवारी परिसरात तऱ्हाने तेली समाजबांधवांनी पिवळी मारबत उत्सव कमिटीची स्थापना केली. आजतागायत ती परंपरा सुरू आहे. यावर्षी मारबत उत्सवात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा सहभाग होणार आहे. ६ सप्टेंबरला सकाळी ८ वाजता नेहरू चौकात महामंडळाच्या सौजन्याने विदर्भाची लोकपरंपरा असलेली खडी गमंत आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
पिवळ्या मारबतीसोबतच काळ्या मारबतीलाही ऐतिहासिक पाश्र्वभूमी आहे. श्री देवस्थान पंच कमेटीतर्फे गेल्या १३० वर्षांंपासून इतवारीतील नेहरू पुतळ्यापासून काळी मारबतीची मिरवणूक काढली जाते. प्रारंभी आप्पाजी मराठे काळी मारबतीची उत्सव साजरा करीत असत. स्वातंत्र्य काळात इंग्रजाची सत्ता होती. जुलमी इंग्रजांच्या कारवायांमुळे जनता त्रस्त होती. त्यावेळी भोसले घराण्यातील बकाबाईने इंग्रजाशी हातमिळवणी केली. त्याचा निषेध करण्यासाठी १८८१ पासून ही काळी मारबत काढण्यात येत आहे. नेहरू पुतळ्याजवळील हनुमान मंदिरात ही काळी मारबत तयार करणे सुरू आहे.