देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले नागपूर रेल्वे स्थानक जागतिक दर्जाचे करण्यासाठी पूर्ण सक्षम असल्याचा निर्वाळा बेल्जियमच्या तज्ज्ञांनी दिला असला तरी प्रत्यक्षात रेल्वे स्थानकाची सद्यस्थिती सामान्य प्रवाशांच्या दृष्टीने फारशी सुखावह नाही. बैद्यनाथ चौक परिसरातील बस स्थानकही अत्यंत वर्दळीच्या आणि अडचणीच्या ठिकाणी असल्याने प्रवाशांची कुचंबणा होते. खाजगी बसगाडय़ांची ठिकाणेही अवघड जागेचे दुखणे झाले आहे. नागपूरच्या रस्त्यांवरील वाढती गर्दी आणि वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिकांना दररोज अनेक समस्यांचा सामना करावा लागत असून या पाश्र्वभूमीवर शहरात मेट्रो रेल्वेचा प्रकल्प आणण्याच्या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. नागपूरचे खासदार विलास मुत्तेमवार यासाठी जोर लावत आहेत. परंतु, महाराष्ट्र सरकारने अद्यापही तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविलेला नसल्याचे समजते.
गेल्या काही वर्षांपासून नागपूर शहर व्यावसायिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठिकाण झाले आहे. मिहान आणि कार्गो हबमुळे शहराचे महत्त्व आणखी वाढणार असून हजारो व्यावसायिक, उद्योजक आणि व्यापारी शहरात येतील. या शहरात मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेशातून येणाऱ्या व्यापारी वर्गाची संख्या प्रचंड प्रमाणात आहे. किमान ४८ जिल्ह्य़ांसाठी नागपूर शहर व्यवसायाचे प्रमुख केंद्र आहे. कोटय़वधींचे व्यवहार नागपूर शहरातून केले जातात. मात्र, वाहतुकीची जागोजागी होणारी कोंडी पाहता भविष्यातील वाहतुकीसाठी मेट्रो रेल्वेची नितांत आवश्यकता असून अखिल भारतीय हातमाग मंडळाचे माजी सदस्य हैदर अली दोसानी यांनी नुकतेच केंद्रीय शहर विकास मंत्री कमलनाथ यांनी मेट्रो रेल्वे सुरू करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी साकडे घातले. दिल्ली आणि कोलकाताच्या धर्तीवर नागपुरात मेट्रो रेल्वे येणे अनिवार्य असल्याचे दोसानी यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना सांगितले. नासुप्रने तीन महिन्यांपूर्वी मेट्रो रेल्वेचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविलेला आहे, अशी माहिती अधीक्षक अभियंता एस.एच. गुज्जलवार यांनी दिली. परंतु, सदर प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी पडून असल्याने केंद्रापर्यंत पोहोचलेला नाही. त्यानंतरच यासंदर्भात हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.
देशाचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या नागपूर शहरातील मध्यवर्ती रेल्वे स्थानकाची बेल्जियम सरकारची कंपनी युरो स्टेशनचे दोन तज्ज्ञ तंत्र संचालक मार्क डी. रिसी आणि आर्किटेक्ट एरिक केलेन्स यांनी नुकतीच पाहणी केली. भारतीय रेल्वेने ऑगस्ट २०१२ मध्ये देशभरातील रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण आणि पुनर्विकासासाठी करार केला होता. देशातील ५० रेल्वे स्थानके आधुनिकीकरणासाठी निवडण्यात आली असून नागपूर रेल्वे स्थानकाचा प्रामुख्याने समावेश आहे.
रिसी आणि केलेन्स या द्विसदस्यीय पथकाने बेल्जियमचे अँटवर्प रेल्वे स्थानकाचा चेहरामोहरा बदलवून त्याला आधुनिक रुप दिले आहे. हे रेल्वे स्थानक एकेकाळी पाडून टाकण्यात येणार होते. या पथकाचा दीर्घानुभव नागपूर रेल्वे स्थानकाच्या एकूणच रचनेत बदल करणारा ठरू शकेल, या दृष्टीने त्यांच्या नागपूर भेटीकडे पाहिले जात आहे.

Story img Loader