चंद्रमणीनगरातील राकेश लिंगायतसह महाराष्ट्राबाहेर आणखी दोन तरुण दुबईतून बेपत्ता झाले असून त्यांना मायदेशी परत आणण्यासाठी भारत सरकारने दुबई सरकारशी चर्चा करावी, अशी विनंती राकेशच्या पालकांनी केली आहे. राकेश गेल्या दीड महिन्यांपासून दुबईत बेपत्ता आहे. तो नॅशनल आजमान पेट्रोलियम कंपनीत गेल्या तीन वर्षांपासून काम करीत होता. कंपनीचे मालवाहक जहाज वादळामुळे समुद्रात बुडाले. जानेवारीत ही घटना घडली.
जहाज बुडण्यापूर्वी जहाजावरील एकूण सहा कर्मचाऱ्यांनी कॅप्टनसह संकटकालीन जॅकेट घालून कॅप्टनच्या आदेशानुसार २८ जानेवारी २०१३ ला रात्री अंदाजे एक ते दीडच्या सुमारास समुद्रात उडी घेतली.
जहाजावर महाराष्ट्राचे कॅप्टन आझाद सिंग(३५), चंद्रपूर जिल्ह्य़ातील भीसीचे स्वप्नील गेडाम(१९) आणि मूल या गावचे निखिल रामटेके(२०), चंद्रमणीनगरातील राकेश मधुकर लिंगायत(२९), मध्यप्रदेशातील मुरैना जिल्ह्य़ाचा सीरमीती येथील राहणारे अरविंद सिंह आणि उत्तराखंडच्या रतनपूर येथील राहणारे अनिल मंगलसिंग असे एकूण सहा कर्मचारी दुबईच्या नॅशनल आजमान पेट्रोलियम कंपनीत कर्मचारी होते.
वरील सहा कर्मचाऱ्यांपैकी कॅप्टन आझाद सिंग आणि स्वप्नील गेडाम हे दोन कर्मचारी जिवंत आहेत. मात्र निखिल रामटेके हा कर्मचारी मरण पावला. कंपनीने जातीने लक्ष घालून दुबईवरून त्याचा मृतदेह चंद्रपूर जिल्ह्य़ातील मूल येथे पाठवला.
राकेश लिंगायत, अरविंद सिंह आणि अनिल मंगल सिंग हे तीन कर्मचारी अद्यापही बेपत्ता आहेत. कंपनीने बराच शोध घेतला पण अद्याप ते मिळू शकलेले नाहीत. राकेशचे वडील मधुकर लिंगायत म्हणाले, केवळ माझाच मुलगा नाही तर इतर दोघेही तरुण भेटायला हवेत. पत्रकार परिषदेत मुलाच्या विरहामुळे ते भावुक झाले.
त्यांना बोलवत नव्हते. हे सर्व कर्मचारी जहाजात काम करण्याकरता आवश्यक असलेले तांत्रिक प्रशिक्षण प्राप्त आहेत. पत्रकार परिषदेच्या माध्यमातून भारत सरकार विनंती करून या तीन तरुणांचा शोध लावण्यासाठी दुबई सरकारशी चर्चा करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पत्रकार परिषदेत नागोराव जयकर, अमन कांबळे, संजय भोवते, पराग लिंगायत, सुदर्शन पाईकराव आणि ए.एन. धनविजय उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा