महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यावर्षी घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा नागपूर विभागाचा निकाल ७३.१० टक्के लागला आहे. राज्यातील ९ विभागीय मंडळांमध्ये नागपूर विभाग सगळ्यात शेवटच्या क्रमांकावर आहे.
गेल्यावर्षी नागपूर विभागाच्या निकालाचे प्रमाण ६२.५९ टक्के होते हे लक्षात घेता यंदा उत्तीर्णतेची टक्केवारी १०.५१ टक्क्यांनी वाढली आहे. ८५.८८ टक्क्यांसह कोकण विभाग राज्यात आघाडीवर असून त्याखालोखाल औरंगाबाद (८५.२६), कोल्हापूर (८४.१४), लातूर(८३.५४), अमरावती (८२.१९), पुणे (८१.९१), नाशिक (७९.०१) व मुंबई (७६.८१) अशी निकालाची टक्केवारी आहे.
नागपूर विभागातून एकूण १ लाख ३५ हजार ४१० विद्यार्थ्यांनी बारावीसाठी नोंदणी केली होती. त्यातून १ लाख ३४ हजार ३५० विद्यार्थी परीक्षेला बसले व त्यापैकी ९८ हजार २१५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ही टक्केवारी ७३.१० टक्के इतकी आहे. यात मुलींनी मुलांवर आघाडी घेतली आहे. उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचे प्रमाण ७१.०१ टक्के, तर मुलींचे प्रमाण ७५.१४ टक्के आहे. पुनर्परीक्षार्थी (रिपीटर) म्हणून या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी ८ हजार ३२४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांची टक्केवारी २८.३० इतकी आहे.
नागपूर विभागात सर्वात जास्त निकाल गोंदिया जिल्ह्याचा लागला असून तेथील उत्तीर्णाची टक्केवारी ८०. २६ टक्के इतकी आहे. त्याखालोखाल नागपूर (७७.२८), गडचिरोली (७४.३९), चंद्रपूर (७०.३२), वर्धा (७०.०४) अशी जिल्हानिहाय टक्केवारी असून, भंडारा जिल्ह्य़ाचा निकाल सर्वात कमी, म्हणजे ५६.७६ टक्के इतका आहे.
नागपूर विभागात शाखानिहाय विचार करता सर्वात जास्त निकाल (९१.११ टक्के) विज्ञान शाखेचा लागला आहे. या शाखेत परीक्षेला बसलेल्या ४७,८५९ विद्यार्थ्यांपैकी ४३,६०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेतून परीक्षेला बसलेल्या ६१,२६६ विद्यार्थ्यांपैकी ३६,६१८ म्हणजे ५९.७७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण आहेत. वाणिज्य शाखेतून परीक्षा दिलेल्या १७,८५२ विद्यार्थ्यांपैकी ११,४५१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून हे प्रमाण ६४.१४ टक्के आहे. एमसीव्हीसी शाखेतून ७,३७३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली व त्यापैकी ६,५४२, म्हणजे ८८.७३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. परीक्षेतील गैरप्रकारांना आळा घालण्याच्या उद्देशाने शिक्षण मंडळाने यंदा इंग्रजी भाषेसाठी बहुसंची प्रश्नपत्रिका योजना आखली होती. नागपूर विभागात यंदा तोतयेगिरीची ३, तर कॉपीची ७६४ प्रकरणे पकडण्यात आली.शिक्षण मंडळातर्फे कनिष्ठ महाविद्यालयांना गुणपत्रिकांचे वाटप गुरुवार ६ जून रोजी सकाळी ११ वाजता करण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना त्याच दिवशी दुपारी ३ वाजेपासून गुणपत्रिका मिळू शकतील. ज्या विद्यार्थ्यांना गुणांची पडताळणी करायची आहे, त्यांनी मूळ गुणपत्रिका मिळाल्यानंतर विहित नमुन्यात शुल्कासह १७ जूनपर्यंत मंडळाकडे अर्ज करायचा आहे. अर्जासोबत मूळ गुणपत्रिकेची छायाप्रत जोडणे आवश्यक राहील. इंटरनेटवरील गुणपत्रिकेची प्रत त्यासाठी चालणार नाही.
विज्ञान – अनम खान, वाणिज्य – सुस्मिता विनोद, कला – अंकित खाडे
नागपूर विभागातून नागपूरच्या शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या जयेश बनसोले या विद्यार्थ्यांला ९६.३३, अस्मिता गेडेकरला ९६.१६ आणि किरण बारापात्रेला ९४. ८३ टक्के गुण मिळाले आहे. आंबेडकर महाविद्यालयातील अनम खान या विद्यार्थिनीला ९७ टक्के चंद्रा मालूला ९५ टक्के तर अतीन खोपाला ९४ टक्के गुण मिळाले आहे. वाणिज्य विभागात नागपूरच्या आंबेडकर महाविद्यालयातील सुस्मिता विनोद या विद्यार्थिनीला ९३ तर भक्ती देव हिला ९१ टक्के गुण मिळाले आहेत. हिस्लॉप कॉलेजचा अंकित खाडे ८९.१६ टक्के मिळवून कला शाखेत प्रथम आला तर एलएडीची सोनाली मार्डीकर हिला ८६ टक्के गुण मिळाले. तिसऱ्या क्रमाकांवर मॉरिस कॉलेजचा निखिल आडे असून त्याला ८५.५ टक्के गुण मिळाले. अमरावती विभागात अमरावतीच्या शिवाजी विज्ञान महाविद्यालयातील अभिषेक मुदगल ५७५ तर ब्रिजलाल बियाणी महाविद्यालयातील ऐश्वर्या राठीला ९५.३ गुण मिळाले आहे. विद्याभारती महाविद्यालयातील मीनाक्षी आतोपाला ५२० आणि धनंजय शेटेला ५१८ गुण मिळाले.
नागपूर विभाग सर्वात शेवटी; निकाल फक्त ७३.१० टक्के
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यावर्षी घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा नागपूर विभागाचा निकाल ७३.१० टक्के लागला आहे. राज्यातील ९ विभागीय मंडळांमध्ये नागपूर विभाग सगळ्यात शेवटच्या क्रमांकावर आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 31-05-2013 at 05:09 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur stood last result just 73