लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने डाव्या पक्षांच्या नेतृत्वाखाली तिसरी आघाडी तयार करण्याचा अखिल हिंद फॉरवर्ड ब्लॉकचा प्रयत्न आहे. त्या संदर्भातील निर्णय चेन्नईमध्ये होणाऱ्या पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात घेतला जाणार असल्याची माहिती फॉरवर्ड ब्लॉकचे नेते जांबुवंतराव धोटे यांनी दिली.
अखिल हिंद फॉरवर्ड ब्लॉकच्या राज्य समितीची नुकतीच नागपुरात बैठक झाली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. बैठकीनंतर बोलताना जांबुवंतराव धोटे यांनी सांगितले, आगामी लोकसभा निवडणुकीत फॉरवर्ड ब्लॉक राज्यात सर्व जागा लढवणार आहे. या निवडणुकांसाठी पक्षाजवळ पैसा नाही, त्यामुळे सक्षम उमेदवार देण्याचा आमचा प्रयत्न राहील. त्यासाठी विविध जिल्ह्य़ातील शहरातील प्रतिष्ठित नेत्यांशी बोलणी सुरू आहेत. राज्यात फॉरवर्ड ब्लॉकचा प्रभाव राहिला आहे. यापूर्वी पक्षाचे दोन खासदार व २१ आमदार निवडून आले होते. नगरपरिषदांवर ताबा मिळविला होता. सांगलीमध्ये मीरजला स्व. वंसतदादा पाटील यांचा प्रभाव असताना त्या ठिकाणी फॉरवर्ड ब्लॉकचे उमेदवार पाठक निवडून आले होते.
देशात डाव्या पक्षाच्या नेतृत्वाखाली तिसरी आघाडी करण्याचा करण्यासाठी प्रयत्न सुरू असून या संदर्भात भाकपचे ज्येष्ठ नेते कॉ. भाई बर्धन, फॉरवर्ड ब्लॉकचे राष्ट्रीय सरचिटणीस देवव्रत विश्वास यांच्याशी चर्चा झाली. अखिल हिंद फॉरवर्ड ब्लॉकचे १७ वे अधिवेशन २२ ते २६ सप्टेंबर दरम्यान चेन्नई येथे आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात तिसऱ्या आघाडीसंदर्भात चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. महाराष्ट्रातून ४० प्रतिनिधी या अधिवेशनात सहभागी होतील. बैठकीमध्ये पक्षाच्या ध्येयधोरणाबाबत चर्चा झाली. स्वतंत्र विदर्भाचे आंदोलन कशासाठी केले जात आहे हे जनतेपर्यंत पोहचणे गरजेचे आहे त्यासाठी फॉरवर्ड ब्लॉकचे कार्यकर्ते विदर्भात जनजागृती करणार असल्याचे धोटे यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा